Anirudh Bapu : मुंबई-महाराष्ट्रात लाखो अनुयायी असलेले आध्यात्मिक गुरू परमपूज्य अनिरुद्ध बापू यांनी दिल्ली न्यायालयात एका वेगळ्याच मुद्यावर याचिका दाखल केली आहे. माझे काही अनुयायी मला देव मानतात, त्यांना मला देव मानण्यापासून रोखावे, कारण मी देव नाही, अशी याचिका परमपूज्य अनिरुद्ध बापू यांनी केली आहे. त्यांच्या मागणीने त्यांचे भक्तही चक्रावून गेले आहेत.
परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या या याचिकेवर न्या. तुषार राव गेडेला यांच्यासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्या. गेडेला यांनी तुमची मागणी आश्चर्यचकीत करणारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तुम्ही स्वतः मुंबईत राहाता, तुमचे कार्य महाराष्ट्रात चालू आहे. तुमचे बहुतांश अनुयायी महाराष्ट्रातील आहेत, असे असताना तुम्ही ही याचिका दिल्लीत का दाखल करत आहात, असा सवाल विचारला . त्यावर देव आणि आध्यात्म हा विषय वैश्विक आहे, असा युक्तिवाद परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वकिलांनी केला.
काही अनुयायी परमपूज्य अनिरुद्ध बापूंचे डीप फेक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करतात. बापू स्वतः कधीही करत नाहीत आणि कधीही करणार नाहीत असे दावे त्यांच्या तोंडी घातले जातात. कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करून बापूंची बनावट छायाचित्रे तयार केली जातात. या छायाचित्रांमध्ये बापू देवी-देवतांसोबत बसल्याचे दाखवले जाते. एकूणच बापू देव असल्याचे भासवले जाते. याला आमचा विरोध आहे. असे कृत्य करणारे जरी त्यांचे अनुयायी असले तरी त्यांना तसे करण्यापासून रोखावे, अशी आमची मागणी आहे, असे परमपूज्य बापूंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
या याचिकेमध्ये फेसबुक, यूट्यूब आणि गुगल आदि कंपन्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. फेसबुकवर बापूंसंबंधी ज्या पोस्ट केल्या जातात त्यापैकी 80 ते 90 टक्के पोस्ट त्यांचा उदो-उदो करणाऱ्या असतात. त्यात त्यांची बदनामी करणारे किंवा आक्षेपार्ह असे काहीही नसते, असे फेसबुकच्या वतीने बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी सांगितले. हे श्रध्देपोटी होत असेल तर त्यामुळे संबंधित व्यक्तिच्या खासगीपणाच्या हक्काचा भंग होतो का, असा सवालही उपस्थित केला. गुगलच्या वतीने वकिलांनी सांगितले की, ज्या लिंकबद्दल तक्रारी आल्या आहेत, त्यापैकी बहुतांश लिंक आता उपलब्ध नाहीत. त्या लिंक एक तर ज्यांनी अपलोड केल्या होत्या त्यांनीच काढून घेतल्या आहेत किंवा तक्रारी आल्यामुळे आम्ही हटवल्या आहेत. त्यावर न्यायालयाने परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या वकिलांना पुढील सुनावणीच्या वेळी ज्या पोस्टवर आणि लिंकवर आक्षेप आहे त्याची तपशिलवार माहिती सादर करा, असे निर्देश दिले.









