Anish Damaniya MITRA: राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारला शाश्वत विकासाबाबत सल्ला देणाऱ्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकीकडे अंजली दमानिया सरकारवर टीका करत असतानाच त्यांच्या पतीची सरकारी संस्थेत नियुक्ती झाल्यामुळे हा निर्णय वादाचा विषय ठरला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत उपरोधिकरित्या निशाणा साधला होता. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित पवारांचा उपरोधिक हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर (एक्स) एक पोस्ट करत या नियुक्तीवर उपरोधिक टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्रावर मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत, तर आता अनिशजींचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले संयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण राहील.”
ह्या ट्वीट बद्दल, मला आत्ता काही पत्रकारांचे फोन आले. तो पर्यंत मी हे ट्वीट वाचलं नव्हत.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 15, 2025
रोहित पवारांचे ट्वीट खोचक आहे असे पत्रकार म्हणत होते. पण मी ते ट्विट वाचल्यावर मला तितकस वाईट वाटलं नाही. हे तर अपेक्षित होतं.
अनिश, हा त्याच्या ऑफिस मधील तिसरा असा व्यक्ती आहे, जो FICCI… https://t.co/942LhWPtk4
अंजली दमानियांचे जोरदार प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या टीकेला अंजली दमानिया यांनी लगेचच जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, “रोहित पवारांचे ट्वीट खोचक आहे, असे पत्रकार सांगत होते. पण ते वाचल्यावर मला तितके वाईट वाटले नाही. हे तर अपेक्षितच होते.”
त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या पतीला हे पद त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळाले आहे. ते एफआयसीसीआयचे सभासद आहेत आणि त्यांना पाच पदव्यांचा अनुभव आहे. सरकारच्या विनंतीनंतर त्यांनी हे पद स्वीकारले आहे. या कामासाठी ते कोणताही मोबदला घेणार नाहीत. त्यांना ना राजकारणाशी घेणे-देणे आहे, ना सरकारशी.”
“माझ्याप्रमाणेच त्यांनाही देशाला पुढे नेण्यासाठी योगदान द्यायचे आहे, आणि ते ते या स्वरूपात देत आहेत. ही बातमी अनिशने स्वतः लिंक्डइन आणि फेसबुकवर शेअर केली आहे आणि मीही ती शेअर केली आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही, मला त्यांचा खूप अभिमान आहे,” असेही अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा – Waqf Act: वक्फ कायद्यातील दोन सुधारणा स्थगित, बोर्ड मुस्लीम बहुलच राहील; कोर्टाचा निर्णय