Ajit Pawar- पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या मुंढवा जमीन गैरव्यवहारामुळे चहूबाजुंनी टीकेचे लक्ष्य बनलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर आणखी एका जमीन व्यवहारात सामिल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यशवंत साखर कारखान्याची सुमारे ५१२ कोटींची जमीन अजित पवार यांच्या आशिर्वादाने अवघ्या २९९ कोटी रुपयांना विकली गेली,अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांदे (Vikas Lavande)यांनी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. महानिरीक्षकांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून याप्रकरणात स्वतः लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत लवांजे यांनी माध्यमांना माहिती दिली.यशवंत साखर कारखान्याची १०० एकरची जमीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या सागण्यावरू पुणे,कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) अवघ्या २९९ कोटी रुपयांमध्ये विकण्यात आली. हा व्यवहारही अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला आणि सरकारचा महसूल बुडवण्यात आला.हा संपूर्ण व्यवहार कोणत्याही सरकारी परवानग्यांशिवाय तसेच बंधनकारक असलेल्या १२ (१) कलमानुसार परवानगी घेतल्याशिवाय करण्यात आला,असे लवांदे यांनी सांगितले.
हा व्यवहार बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश जगताप आणि यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप या दोन भावांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला,असा आरोप लवांदे यांनी केला.
साखर आयुक्त सिध्दराम सालिमठ यांनी या जमिनीसंदर्भात दिलेल्या एका अहवालाचाही लवांदे यांनी उल्लेख केला.सालिमठ यांनी दिलेल्या अहवालात या जमिनीची बाजारभावानुसार किंमत ५१२ कोटी रुपये असून बाजार समितीला ही जमीन कमी किमतीत विकल्यास यशवंत साखर कारखान्याला मोठे नुकसान होईल,असा इशारा सालिमठ यांनी दिला होता,असे लवांदे यांनी सांगितले.
हा व्यवहार करताना यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने सदस्य आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करून जमीन विक्रीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला,असा आरोपही लवांदे यांनी केला.
हे देखील वाचा









