Former MLA Arun Jagtap Passed Away | अहिल्यानगर शहराचे माजी आमदार आणि जिल्हा राजकारणातील अनुभवी नेते अरुणकाका बलभीम जगताप यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात आज (2 मे) पहाटे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या महिन्याभरापासून ते मेंदूतील रक्तस्रावामुळे उपचार घेत होते. अखेर तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता अहिल्यानगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पार्थिवाचे अंत्यदर्शन दुपारी 2 वाजता त्यांच्या भवानीनगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, जिल्हा बँक, आयुर्वेद चौक, नालेगाव मार्गे अंत्ययात्रा अमरधामकडे रवाना होईल.
राजकीय कारकीर्देची प्रदीर्घ वाटचाल
अरुणकाकांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून केली. पुढे नगरपालिकेत नगरसेवक ते सलग पाच वर्ष नगराध्यक्षपद भूषवले. त्यांनी दोन वेळा विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केलं. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभव पत्करावा लागला. तरीही ते पुन्हा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी महापौरपदासाठी आपल्या मुलाला संधी दिली.
सामाजिक, सांस्कृतिक योगदान
राजकारणासोबतच अरुणकाका जगताप यांनी समाजसेवा, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला. ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य, आणि गुणे आयुर्वेद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. वारकरी संप्रदायाशी ते निष्ठेने जोडलेले होते. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारकऱ्यांची सेवा करत.
वैयक्तिक जीवन आणि श्रद्धांजली
त्यांच्या मागे पत्नी पार्वतीबाई, आमदार संग्राम जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन अशी दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे व्याही होते.