Asha Bhosle :l भारतीय सिनेसंगीत क्षेत्रातील जगविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांना आज हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती कळलेली नाही.
ब्रीच कँडी रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी एक्स पोस्ट करून त्यांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले की, माझी आजी आशा भोसले यांना श्वास घेण्यास त्रास आणि छातीत संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सगळे सुरळीत होईल अशी आशा आहे. तुम्हाला याबाबत माहिती देत राहू.
आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजताच जगभरातील संगीतप्रेमींकडून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे. आशा भोसले यांनी 8 सप्टेंबर 2025 रोजी आपला 92 वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध भाषांत 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.











