Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांनी रसिकहृदयावर सात दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय संगीतच नव्हे, तर जागतिक कलाविश्व एका बहुआयामी आणि अद्वितीय गायिकेला मुकले आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. आज दुपारी ४ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आशाताईंच्या निधनापूर्वीच्या काही आठवणी प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी अत्यंत भावूक शब्दांत जागवल्या. निधनाच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी गाडगीळ यांनी आशाताईंशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. या संवादादरम्यान आशाताईंना आपल्या निधनाची जणू पूर्वकल्पना आली होती. त्यांनी अत्यंत शांत स्वरात म्हटले होते की, “आता ९३ वे वर्ष उजाडले आहे, आता जाण्याची वेळ आली आहे. आता भरभरून बोलण्याचे दिवस राहिले नाहीत. यापेक्षा जास्त काळ आम्ही टिकणे शक्य नाही.” या शब्दांतून त्यांची विरक्ती आणि काळाची पावले ओळखण्याची त्यांची दूरदृष्टी स्पष्टपणे जाणवत होती.
या अखेरच्या संवादात आशाताईंनी गाडगीळ यांच्याकडे एक विशेष इच्छाही व्यक्त केली होती. त्यांनी विचारले होते की, “आपल्या ज्या जुन्या मुलाखती आहेत, त्या तुझ्याकडे सुरक्षित आहेत ना?” गाडगीळ यांनी ‘हो’ म्हणताच, त्या मुलाखती एक-दोन दिवसांत ऐकायला आणून देण्याची विनंती त्यांनी केली. “आता प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या जीवनप्रवासाच्या आठवणी पुन्हा एकदा साठवून घेण्याची ओढ व्यक्त केली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट संगीताचा एक सुवर्णकाळ संपुष्टात आला असला, तरी त्यांच्या आवाजातील जादू येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.










