Ashok Kharat : नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashik Kharat) याच्या अटकेनंतर दररोज नव नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातच्या अटकेदरम्यान घडलेली घटना समोर आली आहे. नाशिक पोलिसांनाही (Nashik Police) त्याने विचित्र प्रतिक्रिया आणि पोकळ धमक्यां दिल्याचे समोर आले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटेच गुप्त कारवाई करत खरात याला ताब्यात घेतले. न्यायालयाकडून त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आला आहे. ज्यामध्ये सुरुवातीला ५८, तर पुढे तब्बल १०० व्हिडिओ आढळल्याची माहिती मिळाली आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
“तुम्ही हा घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल,”- अशोक खरात
दरम्यान, अटकेच्या वेळी पोलिसांनी ‘प्रसाद’ (म्हणजेच पोलिसी खाक्या) दाखवताच खरातने आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. “तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल,” अशा शब्दांत त्याने पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याच्या या धमक्यांना भीक घातली नाही.
घरात चोर शिरल्याचा बनाव केला अन् अशोक खरात जेरबंद-
दरम्यान, अशोक खरात याच्या अटकेमागे नाशिक पोलिसांनी आखलेले ‘ऑपरेशन’ही तितकेच नाट्यमय ठरले. संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्ततेत पार पडली. तब्बल पाच पथके तयार करण्यात आली होती, मात्र या पथकांतील अनेक कर्मचाऱ्यांना नेमकी कोणती कारवाई करायची आहे किंवा कोणाला अटक करायची आहे, याची माहिती मात्र शेवटपर्यंत देण्यात आली नव्हती. कायद्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या नावाखाली पोलिसांना लाठ्या, हेल्मेट आणि शिल्ड देखील सज्ज ठेवण्यात आले. एफआय आर नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. ऐनवेळी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ‘घरात चोर शिरल्याचा’ बनाव रचत पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि अखेर खरातला ताब्यात घेतले.










