Ashok Kharat Case : आध्यात्मिक गुरूच्या बुरख्याखाली आर्थिक फसवणूक आणि गैरप्रकार करणाऱ्या कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्याभोवती आता कायदेशीर पाश अधिक घट्ट होऊ लागले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात मोठी कारवाई करत अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर असलेली तीन बँक खाती तातडीने गोठवली (Seal) आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत या खात्यांमधून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ‘ईडी’कडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे केवळ नाशिकमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात याच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरपर्यंत पसरलेला असल्याचे तपासात समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, खरात हा स्वतःला वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचे भासवून धनदांडग्या लोकांना अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) धाडींची भीती दाखवत असे. या दहशतीच्या आधारे त्याने अनेकांकडून खंडणी स्वरूपात मोठी रक्कम उकळल्याचा संशय आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या श्रीमंत भक्तांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचे पुरावेही आता तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. या बेनामी संपत्तीवर आगामी काळात टाच येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (SIT) खरातने एक अत्यंत सूचक आणि गूढ वक्तव्य केल्याचे समजते. “मी इथून जिवंत बाहेर पडू शकेन असे मला वाटत नाही, माझे मरण इथेच ओढवेल,” असे विधान त्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. खरात याच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करतानाच, या प्रकरणातील मोठे मासे वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला जाऊ शकतो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.











