Ashok Kharat Case Nashik : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात आज पुन्हा एकदा एसआयटी आणि न्यायवैद्यक (Forensic) पथक दाखल झाले. या मोहिमेदरम्यान पीडित महिलांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा घटनाक्रम समजून घेण्यावर तपास यंत्रणांनी भर दिला.
कार्यालयातील झाडाझडती आणि जप्त वस्तू-
अशोक खरातने याच कार्यालयाचा वापर दीडशेहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी केल्याचा प्राथमिक संशय आहे. आज झालेल्या तपासणीत एसआयटीच्या हाती काही अत्यंत संवेदनशील पुरावे लागले आहेत. कार्यालयाच्या झाडाझडतीमध्ये विविध प्रकारच्या औषधांच्या बाटल्या, वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे संशयास्पद खडे, तसेच इतर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या आहेत. या सर्व वस्तू पुराव्यासाठी जप्त करण्यात आल्या असून, त्यांचा वापर महिलांना संमोहित करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही गैरकृत्यासाठी केला जात होता का, याचा तपास आता फॉरेन्सिक लॅबमध्ये केला जाईल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल पंचनामा-
तपासात पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी एसआयटीने आज आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. पीडित महिलांनी सांगितलेला घटनाक्रम मोबाईलच्या माध्यमातून ‘लाईव्ह स्क्रीनिंग’ (Live Screening) करून रेकॉर्ड करण्यात आला. तसेच, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या साहाय्याने घटनास्थळाचा ‘डिजिटल पंचनामा’ करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयासमोर सबळ तांत्रिक पुरावे सादर करणे पोलिसांना सोपे जाणार आहे. कार्यालयातील नेमक्या कोणत्या कोपऱ्यात आणि कशा प्रकारे या छळवणुकीच्या घटना घडल्या, याची सविस्तर माहिती पीडितांनी तपास अधिकाऱ्यांना दिली.
अशोक खरात प्रकरण: अडीच हजार ‘कोडवर्ड’ संपर्कांमुळे तपासाचे गूढ वाढले; बँक खाती गोठवली, मालमत्तेचीही चौकशी सुरू-
नाशिक: स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या गुन्हेगारी साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला फास अधिक घट्ट केला आहे. खरातच्या अटकेनंतर सुरू असलेल्या सखोल चौकशीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी खरातचा लॅपटॉप, मोबाईल आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली असून, त्यातून अत्यंत खळबळजनक धागेदोरे हाती लागत आहेत.
मोबाईलमधील ‘कोडवर्ड’चे रहस्य-
अशोक खरातच्या मोबाईलची प्राथमिक तांत्रिक तपासणी केली असता, त्यात अडीच हजारांहून अधिक संपर्क क्रमांक (Contacts) आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व क्रमांक विशिष्ट ‘कोडवर्ड’मध्ये सेव्ह करण्यात आले आहेत. या सांकेतिक नावांच्या मागे नेमक्या कोणत्या व्यक्ती दडलेल्या आहेत आणि त्यांचे खरातशी काय संबंध होते, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. हे कोडवर्ड उलगडल्यास या प्रकरणातील अनेक बड्या हस्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आर्थिक नाड्या आवळल्या; मालमत्तेवर टाच-
केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर खरातच्या आर्थिक व्यवहारांवरही एसआयटीने प्रहार केला आहे. खरातच्या ‘शिवानिका’ या संस्थेची सर्व बँक खाती तातडीने गोठवण्यात (Seal) आली आहेत. त्यासोबतच, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली जमीन, घरे, दुकाने आणि इतर मालमत्तेचा सविस्तर तपशील मागवण्यात आला आहे. ही सर्व संपत्ती महिलांची फसवणूक करून किंवा बेकायदेशीर मार्गाने जमवली आहे का, याची पडताळणी सध्या सुरू आहे.











