Home / महाराष्ट्र / Ashok Kharat Case : नाशिकचे ‘भोंदूबाबा’ प्रकरण: अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; ‘एसआयटी’ पुन्हा घेणार ताबा, उद्या न्यायालयात फेरसुनावणी

Ashok Kharat Case : नाशिकचे ‘भोंदूबाबा’ प्रकरण: अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; ‘एसआयटी’ पुन्हा घेणार ताबा, उद्या न्यायालयात फेरसुनावणी

Ashok Kharat Case : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी...

By: Team Navakal
Ashok Kharat Case
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Case : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील पोलीस कोठडीची मुदत आज, ८ एप्रिल रोजी संपल्याने त्याला न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे (VC) हजर करण्याचे आदेश पाळण्यात आले.

नाशिक सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती श्रीमती बी. ई. ईचपुराणी यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. यावेळी आरोपीचे वकील सचिन भाटे आणि सरकार पक्षातर्फे सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी आपली बाजू मांडली. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी हे देखील पुराव्यांसह न्यायालयात उपस्थित होते. सुनावणीच्या प्रारंभी न्यायमूर्तींनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी त्याचे नाव विचारले. यानंतर, दुसऱ्या गुन्ह्यातील तपासाचा आढावा घेत न्यायालयाने खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

जेलमधून पुन्हा ‘एसआयटी’ कोठडीत जाण्याची शक्यता-
न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे अशोक खरातची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) करण्यात येणार आहे. मात्र, हा ताबा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असल्याचे दिसत आहे. आरोपी विरोधात तिसरा गुन्हादेखील दाखल असून, त्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) पुन्हा त्याचा ताबा घेणार आहे. या तिसऱ्या गुन्ह्यात आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, त्यानुसार त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करावे लागणार आहे.

सरकारी वकिलांची भूमिका आणि कायदेशीर प्रक्रिया-
सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. ते म्हणाले की, “आरोपी विरोधात दुसरा गुन्हा दाखल असल्याने आज त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र, तिसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याचा ताबा मिळवण्याचा अर्ज आम्ही न्यायालयात सादर केला होता, जो मान्य झाला आहे. त्यानुसार उद्या त्याला पुन्हा हजर केले जाईल.” मध्यवर्ती कारागृहात त्याला दाखल करण्याची आणि त्यानंतर पुन्हा एसआयटीने त्याचा ताबा घेण्याची ही कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे.

तपासाची व्याप्ती वाढणार-
अशोक खरातवर असलेले फसवणुकीचे आणि भोंदूगिरीचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचे एकामागून एक पदर उलगडत असून, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या