Home / महाराष्ट्र / Ashok Kharat News : ‘साखरपुडा मोडला, लग्नानंतरही माझ्यावर अत्याचार होत राहिला, तब्ब्ल सात वर्षानंतर पीडितेने सोडलं मौन

Ashok Kharat News : ‘साखरपुडा मोडला, लग्नानंतरही माझ्यावर अत्याचार होत राहिला, तब्ब्ल सात वर्षानंतर पीडितेने सोडलं मौन

Ashok Kharat News : आध्यात्मिक शक्ती आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या...

By: Team Navakal
Ashok Kharat News
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat News : आध्यात्मिक शक्ती आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचे एकामागून एक भीषण पदर उलगडत आहेत. विशेष पोलीस पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘कॅप्टन फाईल्स’च्या तपासात, खरातने कशा प्रकारे श्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राजकारण्यांपासून ते नामांकित दिग्गजांपर्यंत सर्वांचीच उठबस असलेल्या या भोंदूबाबाने केवळ संपत्तीच गोळा केली नाही, तर अनेक महिलांना आपल्या वासनेचा बळी बनवले.

ओळख, विश्वास आणि अत्याचाराचा विळखा
एका पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतून खरातच्या क्रूरतेचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. २०१९ मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात या महिलेची खरातशी पहिली ओळख झाली. स्वतःकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे भासवून त्याने सुरुवातीला महिलेचा विश्वास संपादन केला. २०२१ मध्ये जेव्हा या महिलेचा साखरपुडा मोडला, तेव्हा खरातने तिच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत तिला सावरण्याचे नाटक केले आणि ‘पुष्कराज’ खडा देण्याच्या नावाखाली ५० हजार रुपये उकळले. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याने पीडितेला आपल्या कार्यालयात बोलावले आणि प्रसाद म्हणून दिलेल्या पेढ्यातून व पाण्यातून तिला गुंगी दिली. या अवस्थेत त्याने महिलेवर पहिल्यांदा अत्याचार केला.

‘अवतार’ असल्याचे सांगून दहशतीचा वापर
पीडितेचे लग्न झाल्यानंतरही खरातचा छळ थांबला नाही. त्याने स्वतःला ‘कृष्णाचा अवतार’ घोषित करून पीडितेला ‘मागच्या जन्मातील राधा’ असल्याचे भासवले. इतकेच नव्हे तर, “जर तू माझी प्रेयसी झाली नाहीस, तर तुझ्या पतीचा मृत्यू होईल,” अशी भीषण भीती त्याने महिलेच्या मनात घातली. धर्माचा आणि मृत्यूचा धाक दाखवून त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले. अखेरीस या जाचाला कंटाळून पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने या नराधमाचे बिंग फुटले.

भोंदूबाबाची विशिष्ट ‘मोडस ऑपरेंडी’
तपासादरम्यान खरातची महिलांना जाळ्यात ओढण्याची विशिष्ट पद्धत (Modus Operandi) समोर आली आहे:

अंमली पदार्थांचा वापर: महिलांना सुरुवातीला कडू किंवा खारट चवीचे पाणी आणि पेढा दिला जायचा, ज्यामुळे त्यांना गुंगी येत असे.

विधींचे थोतांड: महिलांच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेवून त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटण्याचे नाटक करत तो अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात करायचा.

मंत्रोच्चाराचा बनाव: महिलांना ‘गायत्री मंत्र’ म्हणायला लावून त्यांचे लक्ष विचलित केले जात असे.

एकांतवासाचा फायदा: महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ‘ध्यानस्थ पूजे’च्या नावाखाली दालनाबाहेर बसवून तो आतमध्ये महिलांचे शोषण करत असे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात अनेक महिलांचे कधी संमतीने तर कधी जबरदस्तीने शोषण करण्यात आल्याची माहिती आहे. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि इतर पीडित महिलांचा शोध घेत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या