Virar building accident case: विरार (Virar building accident case) मधील रमाबाई अपार्टमेंट (Ramabai Apartment) दुर्घटनेप्रकरणी वसई विरार महापालिकेचे (Vasai Virar Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्सिव (Assistant Commissioner Gilson Ghonsalsiv) यांना गुन्हे शाखा ३ च्या पथकाने काल मध्यरात्री अटक केली आहे. इमारत अनधिकृत असूनही कारवाई न करणे तसेच इमारत धोकादायक असताना ती रिकामी न केल्याचा ठपका घोन्साल्सिव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट रोजी विरार पूर्वेला असलेली रमाबाई अपार्टमेट ही चार मजली इमारती कोसळली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ९ जण जखमी झाले होते. ही इमारत अनधिकृत आणि धोकादायक होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून बिल्डर नितल साने याला अटक करण्यात आली होती. नंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला होता.
२०१८ मध्ये इमारतीचे संचरत्नामक लेखापरिक्षण (Structural audit) केल्यावर इमारत अनधिकृत असल्याचे आढळली होती. मात्र तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव यांनी संबंधित बिल्डर सानेविरोधात गुन्हा दाखल न करता केवळ नोटीस बजावली होती. २०२५ मध्ये विद्यमान सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्विस यांनीदेखील बिल्डर विरोधात एमआरटीपीएअंतर्गत कारवाई केली नव्हती. तसेच इमारत धोकादायक असताना ती खाली न करता केवळ डागडुजीची नोटीस बजावली होती. त्यामुळे सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्साल्विस आणि सुभाष जाधव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
काल घोन्साल्विस यांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात १२ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. सहाय्यक आयुक्तांनी वेळीच कारवाई केली असती तर ही दुर्घटना घडली नसती असे गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले.









