Home / महाराष्ट्र / Elections postponed: 12 जिल्ह्यांत निवडणूक पुढे ढकलली ! आयोगाचा घोळ! आता 20 डिसेंबरला मतदान

Elections postponed: 12 जिल्ह्यांत निवडणूक पुढे ढकलली ! आयोगाचा घोळ! आता 20 डिसेंबरला मतदान

Elections postponed – राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक काही तासांवर आली असतानाच न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुणे, ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, चंद्रपूर,...

By: Team Navakal
A
Social + WhatsApp CTA

Elections postponed –  राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक काही तासांवर आली असतानाच न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुणे, ठाणे, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, चंद्रपूर, नांदेड यासह 12 जिल्ह्यांतील अनेक ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, तिथे 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान आता 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.  पण यामध्ये नव्याने कोणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. आयोगाच्या बेजबाबदार कारभारामुळे या निवडणुका न्यायालयीन पेचात अडकून पुढे ढकलल्या ( Elections postponed) गेल्याने उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे.


राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र, आयोगाने काल रात्री उशिरा न्यायालयीन कारणामुळे काही ठिकाणच्या निवडणुका तडकाफडकी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे तिथे 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला मतदान होईल. तर 21 डिसेंबरला निकाल घोषित होणार आहे. उर्वरित ठिकाणी ठरल्याप्रमाणे मतदान होईल.


राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, निवडणूक अर्ज छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली होती. या अपिलांवर 22 नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी निकाल उशिरा लागले किंवा प्रलंबित आहेत. तसेच महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम-1966 नुसार उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक असलेला तीन दिवसांचा कालावधी न देताच काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी चिन्ह वाटप केले. ही प्रक्रिया नियमबाह्य ठरल्याने आयोगाने संबंधित उमेदवारांच्या जागांच्या निवडणुकीला व अध्यक्षपदाच्या बाबतीत संपूर्ण निवडणुकीला स्थगिती दिली आहे. आयोगाच्या याच ढिसाळपणाचा फटका उमेदवारांना बसला आहे.निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आदेश लागू झाल्यापासून संबंधित ठिकाणी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. या अपिलांमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील निवडणूक प्रक्रिया पुढील टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेसह कुळगाव-बदलापूर परिषदेतील सहा प्रभागांमध्ये (5 ब, 15 ब, 17 अ, 10 ब, 8 अ, 19 अ) निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव-दाभाडे आणि लोणावळा येथील प्रत्येकी सहा अशा एकूण 12 जागांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तळेगावमध्ये प्रभाग क्र. 2 अ, 7 अ, 7 ब, 8 अ, 8 ब, 10 ब; तर लोणावळ्यात प्रभाग क्र. 10 अ आणि 5 ब चा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी येथील निवडणुका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत अपील आल्याने पुढे ढकलल्या आहेत. सोलापूरच्या मंगळवेढा येथे नगराध्यक्षपदासह सदस्यपदाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. कारण येथील अपिलावर निकाल 27 नोव्हेंबर रोजी आला. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेची निवडणूक रद्द करून पुन्हा एकदा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.


नांदेडच्या मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आली. भोकर, कुंडलवाडी आणि लोहा येथील एका-एका जागेची निवडणूकही लांबणीवर पडली आहे. धाराशिव नगरपालिकेतील प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब या तीन जागांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील निवडणूक कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. अकोल्याच्या बाळापूर नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासह सर्व 25 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील निवडणूक नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवाराच्या बाजूने न्यायालयाचा निकाल आल्याने स्थगित झाली. यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आहे. जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. चंद्रपूरमधील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. या जिल्ह्यातील गडचांदूर प्रभाग क्र. 8 ब आणि मूळ प्रभाग क्र. 10 ब या वॉर्डातील निवडणुका पुढील निर्णयापर्यंत
स्थगित आहेत.

बारामतीत आठ वॉर्डांत फक्त
नगराध्यक्षपदासाठी मतदान

पवार कुटुंबात मुख्य लढत असलेल्या बारामती नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदासह सात जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बारामती नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, ही प्रक्रिया पावणेतीन वाजताच बंद करण्यात आली. याशिवाय उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. न्यायालयाने भाजपाच्या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबतही न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. बारामतीत अजित पवार गटाचे जे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यांच्यावर याचा कसलाही परिणाम होणार नाही. ते बिनविरोधच नगरसेवक राहणार आहेत. त्यांच्या प्रभागातील मतदार आता फक्त नगराध्यक्षपदासाठी मतदान करतील.


हे देखील वाचा 

 मला भाजपाकडून ऑफर आ. निलेश राणेंचा दावा

डोंबिवलीत उद्घाटन सोहळ्यात भाजपा व शिंदेसेना आमनेसामने

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या