Avinash Jadhav On BJP Nagarsevak Tushar Apte : बदलापूरमधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. या अत्यंत संवेदनशील आणि बहुचर्चित प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपकडून कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तपासानंतर शाळा व्यवस्थापनाशी संबंधित काही व्यक्तींवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात मुख्य आरोपीसह इतर सहआरोपींची नावे पुढे आली असून तुषार आपटे यांच्यावरही सहआरोपी म्हणून आरोप नोंदविण्यात आले आहेत. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून, तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच अशा व्यक्तीस सार्वजनिक पदाची जबाबदारी देण्यात आल्याने नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बालकांवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याशी संबंधित प्रकरणात नाव जोडलेल्या व्यक्तीस राजकीय पद देणे हे सामाजिक मूल्यांना धरून आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः महिला आणि बालहक्क संघटनांकडून या नियुक्तीचा तीव्र निषेध होण्याची शक्यता आहे.
अविनाश जाधवांची आक्रमक प्रतिक्रिया
आता यावरच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. मनसेही या प्रकरणात आक्रमक भूमिकेत आली आहे. यामध्ये भाजपच्या स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठोस भूमिका घेतली आहे. जाधव यांनी स्पष्ट सांगितले की, तुषार आपटे याचे स्वीकृत नगरसेवकपद भाजपने तातडीने रद्द केले पाहिजे; अन्यथा १३ किंवा १४ जानेवारीला बदलापूर येथे मनसे मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे नगरपालिकेतील राजकीय जबाबदारी स्पष्ट करणे आणि नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता असून, आगामी काही दिवसांत भाजप आणि मनसे यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येऊ शकतो.
संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया –
खासदार संजय राऊत यांनी बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेवर टीका करताना शाळेच्या संचालकांची जबाबदारी प्रश्नात आणली. त्यांनी म्हटले की, “घटना घडल्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले; नंतर सरेंडर झाले, आणि आम्हाला वाटले की ते जेलमध्ये आहेत. मात्र आता दिसते की ते नगरपालिकेच्या सभागृहात उपस्थित आहेत. रवींद्र चव्हाण त्यांना घेऊन जाऊन घोड्यावर बसवून चालले आहेत,” असा टोला देखील राऊत यांनी लगावला. याशिवाय त्यांनी तुषार आपटे यांच्यावरही आरोप केले, “आपटे नावाचे गृहस्थ भाजप आणि संघाशी संबंधित आहेत. त्यांना लैंगिक अत्याचारासंदर्भात भाजपने बक्षीस दिले आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
राऊत म्हणाले की, पूर्वी काही प्रकरणांमध्ये इनाम देण्याची पद्धत होती; जर ते निर्दोष सुटले असते तर आम्ही काही बोलले नसते. परंतु अद्याप खटला चालू असल्यामुळे भविष्यातही त्यावर निर्णय येईल, आणि त्यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस त्यांना क्लीन चीट देऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. या विधानामुळे घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा तीव्रगतीने ठसा उमटला आहे.
संगीता चेंदवणकर सावध प्रतिक्रिया-
बदलापूरमधील घटनेवर काही संगीता चेंदवणकर यांनी अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्या म्हणतात की, ही भूमिका त्या पक्षाची वयक्तिक भूमिका आहे; तथापि, या विधानावर सामाजिक व राजकीय वर्तुळात मतभेद निर्माण झाले आहेत.त्या पुढे सांगतात कि हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून न्यायप्रविष्ट आहे.









