झीशान अख्तर कोण आहे? बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कॅनडातून अटक

Baba Siddique Murder Case

Baba Siddique Murder Case | राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीक (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला झीशान अख्तर (Zeeshan Akhtar) याला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

इंटरपोलच्या नोटिसीच्या आधारे कॅनेडियन पोलिसांनीत्याला अटक केली असून, तो गेल्या आठवड्यापासून तिथल्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे बाबा सिद्दीक यांची त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला होता. या हत्येने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.

सिद्दीक यांच्या मुलाने ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’ प्रकल्पात सहभागी असलेल्या बिल्डर लॉबीवर हत्येचा आरोप केला होता, पण पोलिसांनी हा दावा फेटाळला. त्याऐवजी, पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोईचा कॅनडास्थित भाऊ अनमोल बिश्नोईयाला या हत्येचा मास्टरमाइंड ठरवले आहे.

या प्रकरणाचा संबंध सिद्दीक यांचे अभिनेता सलमान खान यांच्याशी असलेल्या कथित नात्यांशी जोडण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत पुणे, उत्तर प्रदेशातील बहराइच, हरियाणा, डोंबिवली आणि कर्जत यासह देशातील विविध भागांतून 26 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गोळीबाराचा मुख्य आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याचाही समावेश आहे. सर्व 26 आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

झीशान अख्तर काय आहे?

झीशान अख्तर हा पंजाबमधील 22 वर्षीय तरुण आहे आणि तो या हत्येतील प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अख्तरने हत्येचे नियोजन केले, 10 पेक्षा जास्त बँक खात्यांमधून आर्थिक व्यवहार सांभाळले आणि इतर आरोपींशी समन्वय ठेवला.

त्याने तुरुंगातील शूटर गुरमेल सिंग याच्यासोबत जवळून काम केले आणि हल्लेखोरांसाठी शस्त्रे आणि आश्रय मिळवण्यात मदत केली. संशय टाळण्यासाठी अख्तर हत्येच्या एक महिना आधीच मुंबईतून निघून गेला होता. तो लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. अनमोल बिश्नोईनंतर कॅनडात ताब्यात घेतलेला अख्तर हा दुसरा प्रमुख आरोपी आहे. या अटकेमुळे पोलिसांना हत्येच्या कटातील इतर कडी जोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. पोलिस आता अख्तरला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या तयारीत आहेत.