Bacchu Kadu: शेतकरी नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा येथील शेतकरी परिषदेत “शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना मारा, कापा” या केलेल्या खळबळजनक विधानावर निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र टीका झाली असताना, बच्चू कडू यांनी ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
बच्चू कडू म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यातून आलेली भावना ही केवळ संताप, दुःख आणि वेदनेपोटी आहे. ते राज्यकर्त्यांना आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना उद्देशून म्हणाले, “शेतकरी रोज मरतो त्याचा तुम्हाला राग येत नाही. आम्ही फक्त बोललो तर संताप व्यक्त करता. एवढं बोलल्याने तुम्हाला झोंबत असेल, तर ज्याच्या घरी मरण येत त्याच्या घरी काय स्थिती असेल, त्या शेतकरी बांधवाच्या यातना काय असतील, दुःख काय असेल.” त्यांनी सवाल केला की, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वेळी राजकीय प्रतिक्रिया का येत नाहीत?
ते म्हणाले, जर आम्ही आमदाराला कापा बोललो तर राग येतो, मग रोज शेतकरी मरतोय, त्याचा राग का येत नाही? शेतकऱ्याला रोज लुटले जाते, त्याचा संताप नाही का? सोयाबीन 3,000 रुपयांना, तर कापूस 6,000 रुपयांना विकावा लागतो, यावर कुणी का बोलत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“या लोकांना पूजा करण्याकरिता ठेवले आहे का? यांना शेतकऱ्यांनीच निवडून दिले, मात्र यांना पार्टी महत्त्वाची वाटते, शेतकरी नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, “असचं सुरू राहिलं, तर आम्ही ठोकणारच आहोत,” असा इशाराही त्यांनी दिला.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, “जर कापसाला ३,००० रुपये भाव मिळाला तर तुम्ही काय कराल? तुम्ही म्हणाल की मी आत्महत्या करेन. अरे, आत्महत्या करण्याऐवजी एखाद्याला मारून टाका, एखाद्या आमदाराला मारून टाका, मग आत्महत्येचा विचार करण्याची गरजच राहणार नाही.”
“आत्महत्या करण्यापेक्षा, आमदारांच्या घरी जाणे, तुमचे सर्व कपडे काढून तिथे बसणे आणि घरासमोर लघवी करणे चांगले; ते मरण्यापेक्षा चांगले आहे.” पुढे बोलताना बच्चू कडू म्हणले तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली, त्यामुळे आमचा शेतकरी मागे राहिला. शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं अशी खळबळजनक विधाने त्यांनी या वेळी केली. बच्चू कडू यांनी आमदारांबद्दल केलेल्या विधानानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे., असे ते म्हणाले होते.
हे देखील वाचा – Asrani Death :’शोले’चे ‘जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन