Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. मात्र, या दुर्घटनेच्या कारणांबाबत राजकीय वर्तुळात आता संशयाचे धुमारे फुटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटनेबाबत पुन्हा एकदा नवीन शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
“नेत्यासोबत पीए का नव्हता?” – सोनवणेंचा सवाल
माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता प्रवास करत असताना, ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्या दिवशी त्यांच्यासोबत एकही पीए (स्वीय सहाय्यक) का नव्हता? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. आमचा एवढा मोठा नेता गेला आहे, तर आम्ही चौकशीची मागणी करायची नाही का?” यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विमान जमिनीला टेकण्यापूर्वीच ब्लास्ट झाला?
सोनवणे यांनी याआधीही विमानातील स्फोटाबाबत संशय व्यक्त केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, “सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत असताना स्फोट झाल्याचे दिसते. विमानाचा पुढचा भाग हवेतच उडाला आणि लोक बाहेर फेकले गेले. हा इंजिनचा तांत्रिक बिघाड होता की विमानात बॉम्ब होता? याची शंका येते.”
मी केवळ संशय व्यक्त केला आहे, आरोप नाही, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कसा झाला होता हा भीषण अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लिअरजेट 45’ या विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून उड्डाण केले होते. विमानात अजित पवारांसह एकूण पाच जण होते.
- अनुभवी वैमानिक: विमानाचे मुख्य वैमानिक सुमित कपूर यांना 16,000 तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा अनुभव होता.
- नेमकी घटना: सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी विमान बारामतीजवळ पोहोचले. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्या प्रयत्नात वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि बारामतीतील गोजुबावी येथील शेतात विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी आता सरकार कोणती पावले उचलते आणि तांत्रिक तपासात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









