Bangalore Metro Name Controversy: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरू मेट्रोच्या शिवाजीनगर भागातील प्रस्तावित मेट्रो स्टेशनला सेंट मेरी असे नाव देण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निर्णयामुळे बंगळुरुत आणि महाराष्ट्रातही वाद पेटला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर कडवट टीका केली आहे, तर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विरोध करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, मुळात बंगळुरूतील ही पिंक मेट्रो लाईन अद्याप सुरुही झालेली नाही.
बंगळुरूची मेट्रो राज्य आणि केद्र सरकार संयुक्त उपक्रम असल्यानं केंद्रातील मोदी सरकारच्या परवानगीशिवाय राज्य सरकारला काही शक्यही नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारलाही शिवाजी नगर मेट्रो स्टेशनला नाव देण्याची मागणी केंद्राकडेच करावी लागणार आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनला सेंट मेरी असे नाव देण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या प्रस्तावाला कर्नाटकातील एका वर्गानं तीव्र विरोध केला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो स्टेशनला दिवंगत कन्नड अभिनेता-दिग्दर्शक शंकर नाग यांचे नाव का देत नाही,असं विचारलं आहे.
सोमवारी बंगळुरूतील सेंट मेरी बॅसिलिका येथिल कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या गेले होते. तेथे त्यांनी आर्चबिशप पीटर मचाडो यांना आश्वासन दिले की, सरकार आगामी पिंक लाईन स्टेशनला सेंट मेरी असे नाव देण्यावर विचार करेल. सिद्धरामय्या म्हणाले आहेत की नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर सादर केला जाईल आणि योग्य प्रक्रियेनुसार विनंतीवर कार्यवाही केली जाईल.
सोशल मीडियावर लोकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका सुरु केली. सेंट मेरीज नाव कशाला, त्यापेक्षा कन्नड भाषा संस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंकर नाग यांचं नाव द्या,अशी मागणी पुढे आली. शिवाजीनगर परिसरातील आमदार रिझवान अर्शद यांनी माध्यमांना सांगितलं की, “मी मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर सेंट मेरीज असे नाव देण्याचा औपचारिक प्रस्ताव मांडत आहे. हे प्रतिष्ठित सेंट मेरीज बॅसिलिकाच्या सन्मानार्थ आहे, ज्याचा समृद्ध इतिहास आहे. बॅसिलिका शिवाजीनगर बस डेपोजवळ आहे आणि प्रवाशांनाही गोंधळाला वाव राहणार नाही.” आमदार पुढे म्हणाले की अशी अनेक स्थानके येत आहेत जी शंकर नाग यांच्या नावावर ठेवता येतील.
एकीकडे कर्नाटकात न धावलेल्या मेट्रोवरून नामकरणाचा वाद सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात शिवाजीनगर परिसरातील मेट्रो स्थानकाला सेंट मेरीज नाव देण्याचा वाद पेटला. तसं नाव देणे म्हणजे महाराजांचा अपमान अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी पंडित नेहरूंपासूनच महाराजांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचं म्हटलं.
मुळात ज्या मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या नावावरून बंगळुरु ते मुंबई वाद पेटला ती पिंक लाईन मेट्रो अद्याप सुरुही झालेली नाही. ती आता पुढील वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरु न झालेल्या मेट्रो स्टेशनच्या नावावरून पेटलेला वाद आता सोशल मीडियावर चेष्टेचा विषय झाला तर आश्चर्य वाटायला नको.
हे देखील वाचा – महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर