Baramati By Election 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक राजकीय घडामोड पाहायला मिळाली. ओबीसी आरक्षणाचे आक्रमक नेते आणि आंदोलक लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीच्या रिंगणातून अनपेक्षितपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरण्याचे ठरवल्यामुळे आता बारामतीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे.
अधिकच्या माहितीनुसार, महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी लक्ष्मण हाके यांची मनधरणी करण्यात यश मिळवले आहे. विशेषतः दत्तात्रय भरणे यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची मध्यस्थी केली. भरणे यांनी हाके यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांचे मन वळवले, ज्यानंतर हाके यांनी केवळ माघारच घेतली नाही, तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आणि मतदारसंघाच्या विकासावर सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
बारामती पोटनिवडणुकीत दत्तात्रय भरणे यांची यशस्वी मध्यस्थी-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ओबीसी हक्क आंदोलनाचे खंबीर नेतृत्व लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्धाराने बारामतीत दाखल झाले होते. मात्र, त्यांच्या या पावलामुळे मतांचे विभाजन होऊन महायुतीसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. हीच बाब ओळखून महायुतीच्या नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आणि राजकीय पेचप्रसंग सोडवण्यासाठी माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रभावी ‘फिल्डिंग’ लावली.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये निर्माण झालेली अत्यंत संवेदनशील आणि भावनिक परिस्थिती लक्षात घेता, ही निवडणूक संघर्षापेक्षा समन्वयाने व्हावी, अशी भूमिका महायुतीने घेतली होती. दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. बारामतीचा विकास आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेतील सातत्य किती आवश्यक आहे, हे भरणे यांनी हाके यांना पटवून दिले. विशेषतः अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महायुतीची शक्ती एकवटणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांच्या आवाहनाला लक्ष्मण हाकेंचा प्रतिसाद; वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर माघारीचा निर्णय-
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यामागे केवळ राजकीय रणनीती नसून, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी साधलेला सुसंवाद कारणीभूत ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेषतः उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्वतः हाके यांना दूरध्वनी करून चर्चेचे आवाहन केले आणि या एका संवादाने बारामतीतील निवडणुकीचे संपूर्ण समीकरणच बदलून टाकले.
या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, केवळ स्थानिक नेतेच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील सर्वोच्च नेतृत्वाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्तात्रय भरणे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी हाके यांच्याशी संवाद साधून त्यांना लोकशाहीच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. हाके यांनी नमूद केले की, जेव्हा राज्याचे नेतृत्व आणि स्वतः उमेदवार सुनेत्रा पवार यांनी इतक्या आत्मीयतेने संपर्क साधला, तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान राखणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांना वाटले.
बारामती पोटनिवडणूक: लक्ष्मण हाकेंचा प्रश्नांशी बांधीलकी कायम ठेवत माघार, तर काँग्रेसच्या उमेदवारीने लढत आता दुहेरी-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक नाट्यमय वळणे येत आहेत. महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझा उमेदवारी अर्ज पूर्णपणे तयार होता, परंतु केवळ वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाचा मान राखून मी माघार घेत आहे. विद्रोहाची भूमिका मांडताना अनेकदा अशा प्रसंगोपात्त तडजोडी कराव्या लागतात; मात्र याचा अर्थ मी माझ्या मूळ प्रश्नांपासून दूर गेलो असा मुळीच नाही.” हाके यांनी पुढे असेही ठामपणे नमूद केले की, आगामी काळातही ते ओबीसी समाजाचे आणि शोषितांचे प्रश्न तितक्याच आक्रमकपणे मांडत राहतील.
दुसरीकडे, ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी महायुतीच्या वतीने अत्यंत गांभीर्याने प्रयत्न केले गेले होते. यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही सविस्तर चर्चा करून त्यांना सहकार्याचे आवाहन केले होते. मात्र, राजकीय मतभेदांमुळे हे प्रयत्न पूर्णतः यशस्वी होऊ शकले नाहीत. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीच्या मैदानात आकाश मोरे यांच्या रूपाने आपला अधिकृत उमेदवार उतरवला असून, त्यामुळे आता बारामतीची निवडणूक बिनविरोध न होता ती दुहेरी लढतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.
या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका विशेष चर्चेची ठरली आहे. रोहित पवार यांनी बारामतीकरांना उद्देशून एक भावनिक आवाहन केले आहे. “ही निवडणूक जरी सुनेत्रा पवार लढवत असल्या, तरी बारामतीकर जनतेने हे समजावे की ही निवडणूक प्रत्यक्ष अजितदादाच लढवत आहेत,” असे सांगत त्यांनी जनतेला सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.










