Jay Pawar Baramati Nagarparishad : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
काही रिपोर्टनुसार, जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. यंदा बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे, अजित पवार पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी आपल्या मुलाला उमेदवारी देऊन एक मोठे धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत नव्या रचनेनुसार 41 नगरसेवकांची निवड होणार आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची? हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. आपण एका सशक्त लोकशाहीत राहतो आणि कोणत्याही पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.”
दरम्यान, जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल अद्याप अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
कोण आहेत जय पवार?
जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू पार्थ पवार यांनी यापूर्वी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
जय पवार यांचा ओढा प्रामुख्याने उद्योग-व्यवसायाकडे आहे. त्यांनी काही काळ दुबईत व्यवसाय केला आणि सध्या ते मुंबई तसेच बारामतीत व्यवसाय सांभाळत आहेत. ते स्थानिक राजकारणात सक्रिय नसले तरी, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर लक्ष देण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ते बारामतीत सक्रियपणे मैदानात उतरले होते. आता ते सक्रिय राजकारणात उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हे देखील वाचा – Raj Thackeray : “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!” नगरपरिषद निवडणूक घोषणेनंतर राज ठाकरेंचा संताप, आयोगावर गंभीर आरोप








