Bhaubeej 2025 : दिवाळीत प्रत्यके सणाला स्वतःचे असे वेगळे महत्व असते. तसेच दिवाळीत भाऊ-बहिणींना विशेष आकर्षण असतं ते म्हणजे भाऊबीजेचं (Bhaubeej). दिवाळीची समाप्तीच भाऊबीजेने होते. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा गोडवा सांगणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:१६ वाजता होईल आणि २३ ऑक्टोबर रोजी रात्री १०:४६ पर्यंत चालेल, त्यामुळे; भाऊबीजच्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे. त्यामुळे तुमच्या भावाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही दुपारी १ वाजून १३ मिनिटं ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.
भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते.भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेला होता अशी अख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याची बहीण यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला कधीच घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे देखील सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हटले जाते.
हे देखील वाचा – Vasai Virar Diwali Fort : वसई विरार मध्ये उभारली गड किल्ल्यांची प्रतिकृती..
(वरील माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. वरील वृत्त हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवतो आहोत.)