Home / महाराष्ट्र / Bhigwan Case : भिगवण अपहरण प्रकरणाला अनपेक्षित वळण; लग्नाच्या काही दिवस आधी ‘अपहरण’; तरुणी म्हणते प्रेमसंबंध, पडळकर म्हणतात दबावाखाली व्हिडिओ

Bhigwan Case : भिगवण अपहरण प्रकरणाला अनपेक्षित वळण; लग्नाच्या काही दिवस आधी ‘अपहरण’; तरुणी म्हणते प्रेमसंबंध, पडळकर म्हणतात दबावाखाली व्हिडिओ

Bhigwan Case : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका नाट्यमय घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. लग्नाची...

By: Team Navakal
Bhigwan Case
Social + WhatsApp CTA

Bhigwan Case : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका नाट्यमय घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. लग्नाची खरेदी करण्यासाठी आई आणि भावासोबत आलेल्या एका तरुणीचे भररस्त्यात अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, अवघ्या काही तासांतच या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले असून, संबंधित तरुणीने स्वतः एक व्हिडिओ प्रसारित करत अपहरणाचा दावा खोडून काढला आहे.

नेमकी घटना काय होती?
भिगवण येथील बाजारपेठेत हि घटना घडली. पीडित २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी जाहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे आई आणि भावाच्या डोळ्यांत लाल तिखट (मिरचीची पूड) फेकून मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर नेल्याची चर्चा परिसरात सुरू झाली होती. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली होती. कुटुंबाने दिलेल्या प्राथमिक माहितीवरून हे अपहरणाचे प्रकरण असल्याचे भासत होते. पोलिस तपास आणि लोकांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेदरम्यान, संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आणि या प्रकरणातील ‘ट्विस्ट’ उघड झाला.

इंदापूर प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण; ‘त्या’ तरुणीचा व्हिडिओ समोर आल्याने अपहरण की प्रेमप्रकरण या वादावर पडदा-
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, संबंधित तरुणी आणि ज्या तरुणावर अपहरणाचा आरोप करण्यात आला होता, ते दोघेही गेल्या काही काळापासून भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यामध्ये सातत्याने मेसेजद्वारे बोलणे होत होते. या माहितीमुळे ही घटना केवळ अपहरण नसून त्यामागे प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे संकेत सुरुवातीलाच मिळाले होते.

तर्क-वितर्कांना पूर्णविराम-
सुरुवातीला मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन तरुणांनी डोळ्यांत तिखट टाकून मुलीला पळवून नेल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे खरोखरच गुन्हेगारी स्वरूपाचे अपहरण आहे की तरुण-तरुणीच्या संमतीने घडलेला प्रकार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, पोलीस अधीक्षक बिरादार यांनी दिलेल्या माहितीमुळे या वादाला दिशा मिळाली.

या प्रकरणात संबंधित तरुणीने व्हिडिओ प्रसारित करून अपहरणाचा दावा फेटाळला असला तरी, पोलीस अद्याप या प्रेमी युगुलाचा शोध घेत आहेत. संशयित आरोपी आणि तरुणी यांच्यातील गेल्या दीड महिन्यातील संभाषणाचे तपशील पोलिसांच्या हाती लागले असून, त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत.

तरुणीचा व्हिडिओ आणि स्वमर्जीने पलायनाचा दावा-
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “माझे आणि त्या तरुणाचे मागच्या एका वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्याने माझ्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी केलेली नाही. मी पूर्णपणे माझ्या स्वतःच्या इच्छेने आणि मर्जीने त्याच्यासोबत आले आहे,” असे तिने या व्हिडिओत नमूद केले. या खुलाशामुळे सुरुवातीला लावण्यात आलेल्या अपहरणाच्या आरोपांतील हवा निघून गेली असली, तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

मध्यरात्रीचे फोन कॉल्स आणि तांत्रिक पुरावे-
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, गेल्या दीड महिन्यात या दोघांमध्ये किमान ११ वेळा संपर्क झाला होता. विशेष म्हणजे, ज्या तरुणावर अपहरणाचा आरोप आहे, त्याने तरुणीला तीन वेळा फोन केले होते, तर तरुणीने त्याला आठ वेळा ‘एसएमएस’ (SMS) पाठवले होते. तरुणाने केलेले हे सर्व फोन कॉल्स मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आले होते. या कॉल्सचा कालावधी अवघा ३ ते ५ सेकंद इतकाच असायचा. यावरून असे दिसून येते की, हे कॉल्स केवळ एकमेकांना संकेत देण्यासाठी (Missed Call स्वरूपात) केले जात असावेत.

व्हॉट्सॲप चॅट आणि डिजिटल तपासावर भर-
सामान्य फोन कॉल्सचा कालावधी कमी असला, तरी त्यानंतर लगेचच या दोघांमध्ये ‘व्हॉट्सॲप’वर दीर्घकाळ संभाषण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. व्हॉट्सॲप कॉल आणि चॅटच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. आता पोलीस या व्हॉट्सॲप चॅटचे तपशील आणि जुन्या संभाषणांची माहिती मिळवण्यासाठी सायबर विभागाची मदत घेत आहेत. या चॅटमधून त्यांच्या नियोजित पलायनाचा कट किंवा इतर कोणाचे सहकार्य होते का, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

पोलीस शोधमोहीम सुरूच-
तरुणीचा व्हिडिओ प्राप्त झाला असला, तरी जोपर्यंत हे दोघे प्रत्यक्ष पोलिसांसमोर येत नाहीत, तोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके विविध ठिकाणी या दोघांचा शोध घेत आहेत.

“तो व्हिडिओ दबावाखाली बनवलेला!”; गोपीचंद पडळकर यांचा दावा-
भिगवण येथील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. संबंधित तरुणीने व्हिडिओ प्रसारित करून आपण स्वमर्जीने गेल्याचे स्पष्ट केले असले तरी, पडळकर यांनी हा दावा फेटाळून लावत यामागे मोठा कट असल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओतील सत्यतेवर प्रश्नचिन्ह-
आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संबंधित तरुणीने जो व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे, तो पूर्णपणे दबावाखाली बनवून घेण्यात आला आहे. त्या मुलीला बळजबरीने असे विधान करायला भाग पाडले गेले असावे, अशी दाट शक्यता आहे.” पडळकर यांच्या मते, एका दहशतीच्या वातावरणात मुलीकडून असे वदवून घेतले गेले असून, हा त्या मुलीचा स्वैच्छिक निर्णय नसून तिच्यावर टाकलेल्या प्रचंड मानसिक दडपणाचा परिणाम आहे.

आरोपी तरुणाच्या पार्श्वभूमीवर निशाणा-
पडळकर यांनी ज्या तरुणावर अपहरणाचा आरोप आहे, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले आहे. त्यांनी असा दावा केला की, संबंधित मुलावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. “हा कोणताही साधा प्रेमप्रकरणाचा प्रकार नसून, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाने रचलेला हा एक सुनियोजित कट आहे. एका निष्पाप मुलीला आपल्या जाळ्यात ओढून, तिला धमकावून अशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड करणे, ही गुन्हेगारांची कार्यपद्धती आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

सखोल तपासाची मागणी-
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, पडळकर यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाचा केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून नव्हे, तर गुन्हेगारी कटाच्या कोनातून तपास करण्याचे आवाहन केले आहे.

दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते, लहाणपणापासूनची ओळख…
तपासादरम्यान १२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीतील संशयितांचे कॉल डिटेल्स (CDR) प्राप्त झाले असून, याद्वारे संबंधित व्यक्तींमध्ये नियमित फोनेवरून संभाषण आणि मेसेज द्वारे बोलणं झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरवातीला या तपासात असे दिसून आले होते की, संबंधित दोन्ही व्यक्ती एकमेकांचे शेजारी असून त्यांची बालपणापासूनची ओळख आहे. आणि आता या प्रकरणात तरुणीचा थेट व्हिडिओचा समोर आला आहे.

Bhigwan Kidnapping Case: या प्रकरणाचा आतापर्यंतचा घटनाक्रम पुढील प्रमाणे –
१. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
२. ही तरुणी बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, तिचा विवाह अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी तिच्याच समाजातील एका युवकाशी निश्चित झाला होता.
३. लग्नाची खरेदी करून आई आणि भावासोबत घरी परतत असताना, वाटेत डोळ्यांत तिखट फेकून तिचे अपहरण करण्यात आले अशी चर्चा होती .या घटनेमुळे स्थानिक स्तरावर संतापाची लाट उसळली , प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास तीव्र केला.
४. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले की, पीडित तरुणी आणि मुख्य संशयित आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे.
५. पोलिसांनी पीडितेच्या आणि संशयिताच्या गेल्या महिनाभरातील फोन संभाषणाचे तपशील (Call Details) प्राप्त केले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
६. या घटनेचे तीव्र पडसाद भिगवण शहरात उमटले. हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा निषेध करत ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्याचे नियोजन केले होते. यात भिगवण बंदची हाक दिली आहे.
७. मात्र, आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा समोर आला असून, संबंधित तरुणीचा एक थेट व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या अपहरणाचा दावा पूर्णपणे फेटाळून लावत, आपण आपल्या स्वमर्जीने संभंधित तरुणासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले.
८. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संबंधित तरुणीने जो व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे, तो पूर्णपणे दबावाखाली बनवून घेण्यात आला आहे.

अनपेक्षित वळणांमुळे संभ्रम वाढला-
भिगवण येथील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने आता एका अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावर येऊन ठेपले आहे. एका बाजूला पालकांनी केलेले गंभीर आरोप, दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेला संशय आणि त्या सर्वांच्या विरुद्ध तरुणीने व्हिडिओद्वारे दिलेली कबुली, यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता केवळ कौटुंबिक वादापुरते मर्यादित न राहता प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भविष्यात काय कायदेशीर कार्यवाही होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कायद्याची भूमिका आणि पोलिसांसमोरचे आव्हान-
तरुणीने व्हिडिओद्वारे आपण स्वमर्जीने गेल्याचे सांगितले असले, तरी कायद्याच्या चौकटीत या व्हिडिओला अंतिम पुरावा मानता येत नाही. जोपर्यंत संबंधित तरुणी स्वतः पोलिसांसमोर किंवा दंडाधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपला जबाब नोंदवत नाही, तोपर्यंत दाखल झालेला अपहरणाचा गुन्हा तांत्रिकदृष्ट्या रद्द होऊ शकत नाही.

संशयाचे धुके आणि सुरक्षिततेचा प्रश्न-
आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे या प्रकरणाला एक गंभीर पदर मिळाला आहे. जर खरोखरच हा व्हिडिओ दबावाखाली बनवला गेला असेल, तर त्या तरुणीच्या जिवाला धोका असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, जर हे निव्वळ प्रेमप्रकरण असेल, तर त्या तरुणीच्या मानवी हक्कांचे आणि तिच्या वैयक्तिक निर्णयाचे रक्षण करणे ही देखील प्रशासनाची जबाबदारी आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तपासाची दिशा आता अधिक सूक्ष्म झाली असून, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्या व्हिडिओचे मूळ स्थान शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे देखील वाचा – BUS Accident : काळा किल्ला आगारात बेस्ट; बसची भिंतीला जोरदार धडक

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या