Home / महाराष्ट्र / Bhigwan Kidnapping Case : माझं आणि त्याचं प्रेम होत, याबद्दल मी घरी सांगितलेलं…नेमकं घडलं काय? अपहरण झालेल्या तरुणीचा प्रतिज्ञापत्रातून सविस्तर खुलासा

Bhigwan Kidnapping Case : माझं आणि त्याचं प्रेम होत, याबद्दल मी घरी सांगितलेलं…नेमकं घडलं काय? अपहरण झालेल्या तरुणीचा प्रतिज्ञापत्रातून सविस्तर खुलासा

Bhigwan Kidnapping Case : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या एका कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला...

By: Team Navakal
Bhigwan Kidnapping Case :
Social + WhatsApp CTA

Bhigwan Kidnapping Case : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या एका कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. लग्नासाठी सोन्याची खरेदी करून आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना, एका २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण आले असून, संबंधित तरुणीने स्वतः समोर येत तिच्या कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकी घटना आणि तक्रारीतील दावा-
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती. पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले होते की, दोन सख्ख्या भावांनी त्यांच्या दुचाकीला अडवून त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून तरुणीला जबरदस्तीने एका टेम्पोमध्ये बसवून पळवून नेले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि संबंधित तरुणांविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातून तरुणीच्या कथित अपहरणाने जो खळबळजनक प्रकार समोर आला होता, त्या प्रकरणाला आता पूर्णपणे वेगळे वळण प्राप्त झाले आहे. तक्रारीनुसार ज्या तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता, ती तरुणी आणि तरुण दोघीही मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

अधिकच्या माहितीनुसार, भिगवण येथील घटनेनंतर हे दोघेही सलग प्रवास करत होते. त्यांनी श्रीगोंदा (अहिल्यानगर जिल्हा) येथून आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर शिक्रापूर, पुणे आणि सासवड असा मार्गक्रमण करत ते महाबळेश्वरला पोहोचले. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि पोलिसांचा वाढता दबाव लक्षात घेता, त्यांनी महाबळेश्वर सोडले आणि थेट बारामती शहर पोलीस ठाणे गाठले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी पोलिसांसमोर हजर होऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

या २१ वर्षीय तरुणीने स्वतः समोर येत एक अधिकृत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केले असून, त्यात तिने आपल्या आईने पोलिसांत दिलेली तक्रार पूर्णपणे खोटी, बनावट आणि दबावापोटी दिलेली असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे आता मुलीच्या कुटुंबीयांनी रचलेले ‘अपहरणाचे नाट्य’ उघडे पडले असून तपासाची दिशा पूर्णतः बदलली आहे.

कुटुंबीयांचे आरोप आणि तरुणीचा प्रतिवाद-
तरुणीच्या आईने भिगवण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, काही तरुणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून आणि डोळ्यांत मिरचीची पूड टाकून मुलीचे अपहरण केले होते. तसेच सोन्याची नथ आणि चांदीची अंगठी हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, तरुणीने आपल्या प्रतिज्ञापत्रात या सर्व घटनाक्रमाचा स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तिने नमूद केले आहे की, “माझ्या आईने कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा दबावाखाली येून ही खोटी फिर्याद दिली आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही हिंसात्मक घटना घडलेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मला माझ्या अपहरणाची आणि चोरीची बातमी समजली, तेव्हा मला धक्का बसला.”

प्रेमसंबंध आणि स्वमर्जीने घेतलेला निर्णय-
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना तरुणीने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, संबंधित तरुणासोबत तिचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. या नात्याबद्दल तिने आपल्या घरच्यांना पूर्वकल्पना दिली होती, परंतु घरच्यांचा या विवाहास विरोध होता. कुटुंबीय तिचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या मुलाशी लावून देण्याचा प्रयत्न करत होते. या दबावामुळे आणि परस्परांवरील विश्वासामुळे तिने स्वतःच्या राजीखुशीने आणि मर्जीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. “मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याविषयी स्वतंत्र निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे,” असेही तिने ठामपणे म्हटले आहे.

आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय- काय झालं? (Bhigwan Kidnapping Case)
१.या प्रकरणाची सुरुवात १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झाली. २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत विवाहाची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होती. याच दरम्यान, तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
२. फिर्यादीनुसार, आई आणि भावाच्या डोळ्यांत चटणी टाकून तरुणीला बळजबरीने नेण्यात आले होते. २२ फेब्रुवारी रोजी या तरुणीचा विवाह नियोजित असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले होते. या घटनेच्या निषेधार्थ भिगवणमध्ये मोठा जनक्षोभ उसळला. ग्रामस्थांनी ‘भिगवण बंद’ची हाक दिली, तर संतप्त जमावाने रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला होता.
३. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासासाठी सहा विशेष पथके रवाना केली होती. सुमारे १६५ किलोमीटरचा ‘रूट मॅप’ तयार करून संशयितांचा माग काढला जात होता. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे तांत्रिक पुरावे मिळाले.
४. अपहरण झालेली तरुणी आणि संबंधित तरुण हे शेजारी असून ते एकमेकांना बालपणापासून ओळखत असल्याचे समोर आले.
५. त्यांच्या कॉल डिटेल्सवरून असे निष्पन्न झाले की, गेल्या महिनाभरापासून त्यांच्यात भ्रमणध्वनीवरून सतत संवाद सुरू होता. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि सोशल मीडियावरील संवादाचीही पोलिसांनी सखोल पडताळणी केली.
६. या प्रकरणाला सामाजिक किंवा धार्मिक वळण लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत खबरदारी घेतली होती. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यास सक्त मनाई केली होती.
७. अखेर २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हे सर्व नाट्य संपुष्टात आले. कथित अपहरण झालेली तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबाने सर्वांनाच धक्का दिला.
८. तिने स्पष्ट केले की, तिचे कुणीही अपहरण केलेले नसून ती स्वतःच्या राजीखुशीने आणि इच्छेने घर सोडून गेली होती. कुटुंबाने दिलेली अपहरणाची आणि मारहाणीची फिर्याद खोटी असल्याचे तिने नमूद केले. सध्या, सुरक्षिततेचा उपाय म्हणून तरुणाला एका अज्ञात स्थळी हलवले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या