Home / महाराष्ट्र / Bhiwandi Mayor : भिवंडीत भाजपाला मोठा धक्का ! बंडखोर महापौर! 6 मते फुटली

Bhiwandi Mayor : भिवंडीत भाजपाला मोठा धक्का ! बंडखोर महापौर! 6 मते फुटली

Bhiwandi Mayor : भिवंडी महापालिकेत काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का देत सत्ता काबीज केली. महापौरपदी भाजपाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी तर...

By: Team Navakal
Mayor
Social + WhatsApp CTA
Bhiwandi Mayor : भिवंडी महापालिकेत काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का देत सत्ता काबीज केली. महापौरपदी भाजपाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन हे निवडून आले. महापौर निवडीच्यावेळी भाजपाचे बंडखोर चौधरी गटातील 6 भाजपा नगरसेवकांची मते फुटली. आधी हा आकडा 9 सांगितला जात होता. उपमहापौर निवडीच्यावेळी यातील पाच मते पुन्हा भाजपाकडे वळली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा दिला. भाजपाच्या इतिहासात अशी फूट प्रथमच घडली. सध्या भाजपा सर्वत्र प्रबळ असताना नारायण चौधरी यांनी बंडखोरी केली आणि त्यांच्यासह 6 नगरसेवक गेले हे भाजपासाठी धक्कादायक आहे. भाजपाने उभ्या केलेल्या उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मते पडली.


भारतीय जनता पार्टीने चंद्रपूरमध्ये कमी संख्याबळ असतानाही ऐनवेळी केलेल्या राजकीय खेळीच्या माध्यमातून महापौर बसवला त्याचा वचपा काँग्रेसने मुंबई शेजारच्या भिवंडीमध्ये काढला. भारतीय जनता पार्टीने आधी महापौरपदासाठी नारायण चौधरी यांना उमेदवारी दिली.  मात्र त्यांच्या नावाला विरोध झाल्याने ऐनवेळी वाद शमवण्यासाठी उमेदवार बदलून स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र यामुळे चौधरी अधिकच भडकले. त्यांनी भाजपाच्या 6 नगरसेवकांसहीत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाला काँग्रेसने पाठिंबा दिला. काँग्रेसने समाजवादी पार्टीला सोबत घेऊन सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. या सर्वांनी एकत्र येत महापौर
म्हणून भाजपात बंडखोरी केलेले चौधरी यांना निवडून आणले. हात वर करून मोजणी करीत ही निवड झाली.

भाजपाचे नारायण चौधरी, नंदिनी गायकवाड ,सुहास नकाते, दीपा मढवी, अश्विनी फुटाणकर, अबूशाह शेख यांनी बंडखोरी केली. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होतो का हा प्रश्न आहे. मात्र पालिका कायद्यातील तांत्रिक बाबींमुळे त्यांचे नगरसेवक पद वाचते असे सांगितले जाते.त्याआधी आज सकाळी भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका  महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी  मुख्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुमारे 100 मीटर  अंतरावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावले होते.महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत  नारायण चौधरी यांना 48 मते मिळाली तर  भाजपाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या स्नेहा मेहुल पाटील यांना अवघ्या  16 मतांवर समाधान मानावे लागले. कोणार्क पक्षाचे विलास पाटील यांना 25 मते मिळाली . या निवडणुकीपूर्वी भाजपाकडून गटनेते संतोष शेट्टी यांनी व्हीप जारी करत व्हिपचे  पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. भाजपाचे महेश चौगुले यांनी मात्र शिंदे सेनेने ही फूट पाडली असा आरोप केला.


भिवंडी-निजामपूर महापालिकेत काँग्रेसकडे 30 जागा होत्या,  शरद पवार गटाकडे 12 आणि बंडखोर असे मिळून विजयाचे गणित जुळवण्यात आले. बहुमताला 48 मते आवश्यक होती . सभागृहात हात वर  करून मतदान घेण्यात आले. तेव्हा सुरुवातीला नारायण चौधरी यांच्यासाठी मतदान झाले . त्यांना 48 मते मिळाली.किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते त्या कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांचीही निराशा झाली. न्यायालयीन कोठडीत असताना मतदानाचा अधिकार मिळाल्याने चर्चेत आलेल्या पाटील यांना सभागृहात पोचण्यास विलंब झाल्याने गदारोळ उडाला. त्यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता, पण त्यांना 25 मतांवर समाधान मानावे लागले.


त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. यावेळी काँग्रेसचे तारिक मोमीन हे विजयी झाले. त्यांना 43 मते मिळाली तर शिंदे सेनेच्या जावेद दळवी यांना 25 व भाजपाच्या बंडखोर सुहास नकाते यांना 21 मते मिळाली. महापौरांच्या तुलनेत उपमहापौरांना पाच मते कमी मिळाल्याने भाजपाची पाच मते यावेळी परत फिरल्याचे दिसले.नंतर वार्ताहरांशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. सुरेश म्हात्रे यांनी नूतन महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन केले आणि भिवंडीच्या विकासाला चालना मिळेल असा दावा केला. महापौर नारायण चौधरी यांनी हा भिवंडीच्या जनतेचा विजय असल्याचे सांगून आम्ही कुणाला दुखावलेले नाही तर विकासासाठी  सोबत घेऊन जाणार आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना बंडखोरीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, भिवंडी महापौर पदासाठी काय करता येईल याबाबत चर्चा सुरु होती. काल संध्याकाळपासून ते आज सकाळपर्यंत नारायण चौधरी यांना असे करू नका असे समजावत होतो.त्यांनीही आम्ही असे करणार नाही असे म्हटले होते. पण तरी त्यांनी बंडखोरी केली. पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यांच्यासह बंडखोर नगरसेवकांवर  कारवाई केली जाईल.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या