Bhujbal’s strange advice : आखाती युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने एका बाजूला होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक रोखली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे मित्र असलेल्या देशांतील तेल रिफायनरींवर हल्ले सुरू ठेवले आहेत. आजही इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला. त्यामुळे भारतातील तेलसंकट आणखी गंभीर होणार आहे. गॅसपुरवठ्याअभावी हॉटेल, खाणावळी चालकांवर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हॉटेल व्यावसायिकांना अजब सल्ला दिला आहे की, गॅसला पर्याय म्हणून हॉटेलनी केरोसिनचा वापर करण्याचा विचार करावा. मात्र, केरोसिन किती उपलब्ध होणार आहे आणि केरोसीन वापरण्यासाठी हॉटेलची संपूर्ण यंत्रणा बदलावी लागेल. यामुळे भुजबळांचा सल्ला अंमलात आणायचा कसा, असा सवाल हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.
राज्यातील गॅस तुटवड्याबाबत बोलताना छगन भुजबळ आज म्हणाले की, गॅसचा तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मात्र, सध्या जगभरात अस्थिरता आहे. पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून घरगुती गॅसनिर्मिती वाढवण्याचे आदेश दिले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने गॅस देण्याचे आदेश आहेत. या परिस्थितीत हॉटेल व्यावसायिकांना तातडीने मदत करणे कठीण आहे. गॅसला पर्याय म्हणून हॉटेलनी केरोसीनचा वापर करण्याचा विचार करावा. मात्र त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या यंत्रणा बदलाव्या लागतील.
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठीच्या उपायाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, गॅस सिलिंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी सरकारने प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. सर्व पुरवठा अधिकार्यांना प्रत्येक विक्रेत्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणताही विक्रेता बेकायदेशीर साठा करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या संकटाचा तो परिणाम आहे.
इराणच्या तेल प्रकल्पावरील हल्ल्यांनंतर उद्भवलेल्या संभाव्य ऊर्जा संकटाच्या भीतीमुळे पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने सदस्य देशांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत जागतिक तेल पुरवठ्यावरील धोके तपासले जाणार आहेत. आखातातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेल उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे कार्यकारी संचालक फातीह बिरोल यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत तेल बाजारातील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद झाल्याने तेल उत्पादनात मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. त्यामुळे तेल उद्योग संकटात सापडला आहे.
जी-7 या जगातील सात प्रमुख प्रगत अर्थव्यवस्थांच्या गटाचे नेतेही जागतिक बाजार स्थिर ठेवण्यासाठी चर्चा करत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, वाढत्या ऊर्जा संकटावर उपाययोजना करण्यासाठी जी-7 देश या आठवड्यात सल्लामसलतकरणार आहेत.
इराणने आतापर्यंत सौदी अरेबियातील सौदी अरामको कंपनीच्या रास तनुरा रिफायनरीसह काही तेल प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तेल उत्पादन थांबवावे लागले होते. सौदी अरामको ही सौदी अरेबियाची राष्ट्रीय तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे. ती जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक आणि सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नासेर यांनी इशारा दिला आहे की, हा संघर्ष सुरू राहिल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर विनाशकारी परिणाम होऊ शकतात. या संघर्षामुळे जहाज वाहतूक, विमा, विमानवाहतूक, शेती, वाहन उद्योग आणि इतर अनेक क्षेत्रांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जगातील सुमारे 20 टक्के तेल पुरवठा होणारा महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी ताबडतोब खुली करायला हवी.
या युद्धामुळे संपूर्ण गल्फ प्रदेशातील ऊर्जा उद्योगावर दबाव वाढला आहे. ऊर्जा विश्लेषक रॉबर्ट मोगीलनिकी यांनी म्हटले आहे की, आखातातील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होत आहेत. होर्मुज सामुद्रधुनीतून निर्यात मर्यादित झाली आहे आणि साठवणूक क्षमतादेखील संपत चालली आहे.
इराणी हल्ल्यांमुळे कतार एनर्जीला काही काळ उत्पादन थांबवावे लागले असून काही निर्यातीवर ‘फोर्स मॅज्योर’ घोषित करण्यात आले आहे. ‘फोर्स मॅज्योर’ हे करारातील एक महत्त्वाचे कलम आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती, युद्ध, साथीचे रोग किंवा नियंत्रणाबाहेरील अनपेक्षित घटनांमुळे काम पूर्ण करणे अशक्य झाल्यास, करारातील पक्षांना त्यांच्या जबाबदार्यांतून तात्पुरती मुक्ती मिळते. कुवैतमधील ऊर्जा कंपन्यांनीही अशाच इशार्यांचे संकेत दिले आहेत.
रूवैस तेल प्रकल्पावर हल्ला
इराण युद्धाच्या बाराव्या दिवशी आज इराणने अबू धाबीतील रुवैस इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर या प्रकल्पाला भीषण आग लागली. अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील तेल उत्पादन तात्पुरते थांबवले. या रिफायनरीची क्षमता दररोज सुमारे 9,22,000 बॅरल तेल प्रक्रिया करण्याची आहे. रुवैस हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एकाच ठिकाणी असलेले तेल शुद्धीकरण केंद्र आहे. या औद्योगिक परिसरात काम करणार्या एका चालकाने सांगितले की, हल्ल्यानंतर कामगारांना बाहेर काढले जात असताना स्फोटांचे आवाज ऐकू आले. संकुलातून दोन ठिकाणी मोठ्या ज्वाळा उठताना दिसल्या.
एलपीजीची टंचाई नाही
सुजाता शर्मा यांची माहिती
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग व ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, देशभरात एलपीजीची कोणतीही मोठी टंचाई नाही. लोकांनी घाबरून बुकिंग केल्यामुळे सिलिंडर मिळण्यासाठी सरासरी 25 दिवस लागत आहेत. यासाठी डिलिव्हरी कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. जेणेकरून सिलिंडरचे न्याय्य वितरण सुनिश्चित करता येईल. तसेच होर्मुझचा मार्ग बंद असल्याने इतर ठिकाणांहून तेलखरेदी केली जात आहे. दोन एलएनजी कार्गो भारताकडे येत असून ते एक-दोन दिवसांत ती भारतात पोहोचतील. त्यामुळे सध्या देशात असलेल्या तेलाचे प्रमाण होर्मुझ खाडीतून येणार्या तेलापेक्षा जास्त आहे. सध्या घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिले जात आहे. घरगुती नसलेल्या वापरासाठी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था यांसारख्या अत्यावश्यक सेवांना










