महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपाचे वर्चस्व; दरेकरांकडे एकहाती सत्ता

Pravin Darekar

मुंबई –महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Maharashtra State Cooperative Union Elections) भाजपाला (BJP) मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत दरेकर पॅनलने बहुमत मिळवत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकरांकडे (Pravin Darekar) एकहाती सत्ता आली असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीच्या निकालादरम्यान दरेकर पॅनल आघाडीवर होते आणि सर्व १५ जागांवर त्यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांचे बंधू प्रकाश दरेकर हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण २१ संचालकांच्या जागांपैकी ९ जागा बिनविरोध गेल्या आहेत, तर उर्वरित १२ जागांसाठी ३० उमेदवारांनी निवडणुकीत भाग घेतला होता. या जागांसाठी २७ जुलै रोजी मतदान पार पडले. बिनविरोध विजयी झालेल्या ९ संचालकांमध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थांच्या वैधानिक कार्यक्षेत्रातील मतदारसंघांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई विभागातून आमदार प्रवीण दरेकर, पुणे विभागातून हिरामण सातकर, कोकण विभागातून अरुण पानसरे, छत्रपती संभाजीनगर विभागातून गुलाबराव मगर आहेत. तसेच राज्यस्तरीय संघीय संस्था मतदारसंघातून प्रकाश दरेकर, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विष्णू घुमरे, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून अनिल गाजरे आणि महिला प्रतिनिधींमध्ये जयश्री पांचाळ व दीपश्री नलवडे यांचा समावेश आहे.