BJP MIM Alliance : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत सत्तेच्या गणितासाठी भाजप आणि एमआयएम (MIM) यांनी एकत्र येत स्थापन केलेली युती अखेर मोडीत निघाली आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त होताच ही युती मागे घेण्याची नामुष्की स्थानिक नेत्यांवर आली आहे.
नेमके प्रकरण काय?
अकोट नगरपालिकेच्या 35 पैकी 33 जागांच्या निकालात भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी 17 जागांची आवश्यकता असताना भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला. या मंचात त्यांनी चक्क एमआयएमच्या 5 नगरसेवकांना सोबत घेतले होते.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या भाजपने एमआयएमशी हातमिळवणी केल्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. विरोधकांनीही यावरून भाजपला घेरले होते.
मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि कारवाई
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कठोर भूमिका घेतली. “ही युती तत्त्वशून्य असून ती आम्हाला मान्य नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. “पक्षाची प्रतिमा मलिन का केली?” असा सवाल या पत्रातून विचारण्यात आला असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
एमआयएमची माघार
दुसरीकडे, एमआयएमनेही या वादातून अंग काढून घेतले आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांनी दिलेल्या पत्रानुसार, एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत भाजपसोबतच्या या आघाडीतून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये रेश्मा परवीन, युसुफ खान, हन्नान शाह, दिलशाद बी आणि अफरीन अंजुम या नगरसेवकांचा समावेश आहे.
या सर्व प्रकारामुळे अंबरनाथ आणि अकोटमधील स्थानिक आघाड्यांचे राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी भाजपकडून आता हे ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू असल्याचे मानले जात आहे.









