भंडारा – भंडाऱ्यातील सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (Cooperative Bank Election) पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटात (BJP and Shinde group) वाद चिघळला आहे. शिंदे गटाचे आमदार आणि पूर्व विदर्भाचे समन्वयक नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे भाजपाचे आमदार परिणय फुके आक्रमक झाले आहेत, त्यांनी भोंडेकरांनी महायुतीतील निष्ठा विसरल्याचा आरोप केला आहे.
फुके म्हणाले की, भोंडेकर कोणाच्या आधारावर विधानसभेत निवडून आले हे लक्षात ठेवावे. त्यांना शिवसेनेने मोठे पद दिले आहे. म्हणून त्यांना काम करावे लागेल म्हणूनच ते विरोधकांशी हातमिळवणी करत आहेत.
या टीकेला उत्तर देताना आमदार भोंडेकर म्हणाले की, विधानसभा मी माझ्याच बळावर लढलो आणि जिंकलो. फुके आणि प्रफुल पटेल यांनी माझ्यासाठी किती सभा घेतल्या? मी अनेक वेळा विनंती केल्यावर प्रफुल पटेल यांनी एकच सभा घेतली, तीही हॉलमध्ये घेतली होती. आम्ही एकत्रित काम केले असते, तर भंडाऱ्याचे चित्र वेगळे असते. त्यावेळी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी माझ्याविरोधात काम केले. मी तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर काहींना निलंबितही करण्यात आले होते. मात्र नंतर पुन्हा त्यांना पक्षात घेतले. सहकार क्षेत्रात पक्षीय भूमिका नसते. स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या जातात. फुके आणि प्रफुल पटेल यांनी आघाडी केली, तेव्हा आम्हाला विचारले नाही. त्यांनी जागाही सोडल्या नाहीत. त्यामुळे आम्ही नाना पटोले आणि खासदार सुनील पडोळे यांच्यासोबत आघाडी केली. ती फक्त या निवडणुकीपुरती मर्यादित आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात भाजपा नेते सुनील केदार आणि काँग्रेसने मौदा बाजार समितीत युती केली होती, तेव्हा कुणी काही बोलले नाही.











