Home / महाराष्ट्र / Ram Satpute : राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार; नेमकं घडलं काय?

Ram Satpute : राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर जोरदार पलटवार; नेमकं घडलं काय?

Ram Satpute : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना...

By: Team Navakal
Ram Satpute
Social + WhatsApp CTA

Ram Satpute : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना वेग आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरस येथील भाजप नेते राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप करत, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे जाहीर केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राम सातपुते यांनीही या दाव्याला दुजोरा देत, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटातील काही व्यक्तींचा या कटात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत या आरोपांना ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले. माळशिरस तालुक्यातील ९ पैकी ७ जिल्हा परिषद जागांवर त्यांच्या गटाने विजय मिळविल्याचे सांगत, सातपुते यांनी माध्यम व्यवस्थापनाच्या जोरावर केवळ एक जागा जिंकली, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आली की पराभवानंतर सातपुते वेगळ्याच भूमिकेत जातात आणि स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी कोणत्याही स्तराला जातात, अशी टीका त्यांनी केली. राम सातपुते कोणतीही बातमी कोणत्याही प्रकारे प्रसारित करतात, असा आरोप करत त्यांनी माढा लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पालकमंत्र्यांना अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ते आणि सातपुते दोघेही वैफल्यग्रस्त झाले असल्याचा दावा केला. त्यामुळेच विकासकामांपासून लक्ष विचलित करून जनतेला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीच्या काळात पराभव स्वीकारण्याऐवजी इतरांवर आरोप करण्याची पद्धत सातपुते यांची असल्याची टीकाही त्यांनी केली.

मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळासाठी राम सातपुते हेच जबाबदार असल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. मतमोजणीच्या वेळी सर्व पक्षांचे समर्थक एकाच ठिकाणी उपस्थित असतात, त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणे आवश्यक होते, असे त्यांनी नमूद केले. मात्र, मतमोजणी सुरू असताना राम सातपुते तेथे गेले आणि त्यांच्या माने आडनावाच्या उमेदवाराच्या तोंडावर गुलालाची गन मारली, त्यामुळेच वातावरण तणावपूर्ण बनून गोंधळ निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. सातपुते हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही स्तराला जातात, अशी टीका करत मोहिते पाटील यांनी सांगितले की, सातपुतेंच्या पत्नीविरुद्ध त्यांच्या कुटुंबातील उमेदवार उभा करून त्यांना त्या मतदारसंघातच गुंतवून ठेवण्याची रणनीती आखण्यात आली होती आणि त्यात त्यांना यश आले.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर टीका केली. मोहोळ तालुक्यातील जनतेने नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून भाजपला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. खोटी आश्वासने देणे व विनाकारण टीका करणे मोहोळच्या सुसंस्कृत राजकारणाला मान्य नसल्याचा संदेश जनतेने दिला आहे, असे ते म्हणाले. उमेश पाटील शब्दाला खरे ठरणारे असतील आणि त्यांनी संन्यास घेण्याची घोषणा केली असेल, तर त्यांनी सौंदत्तीला जावे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, संन्यासासाठी आवश्यक पोशाख हवा असल्यास तो देण्याचीही तयारी असल्याचे सांगत त्यांनी उपरोधिक शब्दांत उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधला. या वक्तव्यांमुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरणातही चांगलीच चर्चा रंगली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या