Home / महाराष्ट्र / BJP Shiv Sena Alliance : १४ महानगरपालिकांमध्ये महायुतीचे साम्राज्य विस्कटले; उमेदवारी अर्जावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयासमोर हायहोल्टेज ड्रामा

BJP Shiv Sena Alliance : १४ महानगरपालिकांमध्ये महायुतीचे साम्राज्य विस्कटले; उमेदवारी अर्जावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयासमोर हायहोल्टेज ड्रामा

BJP Shiv Sena Alliance : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा...

By: Team Navakal
BJP Shiv Sena Alliance
Social + WhatsApp CTA

BJP Shiv Sena Alliance : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांमध्ये हालचालींना वेग आला होता. या प्रक्रियेत अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली असली, तरी काही ठिकाणी पक्षातील ज्येष्ठ व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी डावलण्यात आल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, विविध ठिकाणी नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत.

काही महानगरपालिकांमध्ये स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात युती करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी परस्परांशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, काही मतदारसंघांमध्ये पक्षांतर केलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्व १४ महानगरपालिकांमध्ये नेमकी राजकीय समीकरणे कशी बदलणार, कोणत्या पक्षाला याचा फायदा होणार आणि कोणत्या ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.

युती नेमकी कुठे-कुठे तुटली?
महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अनेक ठिकाणी तीव्र मतभेद समोर आले. काही महानगरपालिकांमध्ये भाजपाने अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याचा आक्षेप घेत कठोर भूमिका घेतली, तर काही ठिकाणी शिंदे गटाने युती करण्यास स्पष्ट नकार दिला.

या परस्पर मतभेदांचा थेट परिणाम म्हणून राज्यातील एकूण १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेची युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहेत.

या सर्व ठिकाणी थेट सामना रंगणार असून, यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. महायुतीतील या तुटवड्याचा स्थानिक राजकारणावर नेमका कसा परिणाम होणार, आणि मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्शवभूमीवर राजकीय स्तरातून देखील विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सातत्याने चर्चा केली असतानाही भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असा थेट आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या वैयक्तिक अहंकारामुळे आणि हट्टाग्रहामुळेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती तुटली, असा ठाम दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचाही शब्द दुर्लक्षित?
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर तीव्र शब्दांत टीका केली. जागावाटपाचे सूत्र आधीच निश्चित झाले असतानाही भाजपने जाणूनबुजून तिढा निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी त्रुटी असू शकतात, हे मान्य करत असतानाही भाजपकडून कोणताही नवा किंवा पर्यायी प्रस्ताव सादर करण्यात आला नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

“चर्चा सुरू असताना केवळ ‘थांबा आणि वाट पाहा’ असा निरोप देत वेळकाढूपणाची भूमिका घेतली गेली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असतानाही स्थानिक पातळीवर त्याला प्रतिसाद न मिळाल्याचेही त्यांनी सूचित केले.

या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगरमधील महायुती तुटण्यास हातभार लागला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध उभे ठाकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अहंकाराचा फटका
भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना आधीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देत युतीधर्माचे पालन केले नाही, असा गंभीर दावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. महायुती टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले; मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या अहंकारी भूमिकेमुळेच हा पर्याय निष्फळ ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आम्ही काहीही करू शकतो,” अशा वृत्तीचा अवलंब भाजपच्या काही नेत्यांनी केल्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला, असा आरोप त्यांनी केला. युती वाचवण्याचे सर्व मार्ग संपल्यानंतर आता स्वबळावरच निवडणूक लढवण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असेही शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.

या निर्णयामुळे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नाराज नेते व कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसत असून, छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक आता अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले. सकाळी एबी फॉर्म दाखल करण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक असताना घडामोडींना अचानक वेग आल्याचे देखील दिसून आले. महायुती तुटल्यानंतर आपल्याला सहज उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना होती; मात्र ऐनवेळी तिकीट नाकारल्याचे समोर येताच असंतोषाचा उद्रेक झाला.

मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा हाय-होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहूनही उमेदवारी न मिळाल्याने महिला इच्छुक उमेदवारांनी जोरदार गदारोळ घातला. काही पुरुष उमेदवारांनी कार्यालयाबाहेर उभारलेल्या पेंडॉलमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. या गोंधळाच्या दरम्यान काही महिलांना भोवळ आल्याचेही पाहायला मिळाले.

वॉर्ड क्रमांक २२ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्याने एका इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर झाले, तर त्याच्या पत्नीला देखील भावना आवरता आल्या नाहीत. याचवेळी अन्य वॉर्डांमधील महिला उमेदवारांनीही तीव्र संताप व्यक्त करत मोठा राडा घातला. भाजपच्या अत्यंत जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्या असलेल्या लता दलाल यांनाही तिकीट नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे नाराजी आणखी तीव्र झाली आहे.

या घटनांनंतर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. एकनिष्ठ असूनही एबी फॉर्म नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी टाहो फोडला. काहींनी तर “भाजप रसातळाला चालली आहे,” असा गंभीर आरोप करत आपली तीव्र नाराजी उघडपणे व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील महिला उमेदवारांनी तिकीट वाटप प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की नवीन आलेल्यांना तिकीट दिले गेले, तर पैसे घेऊन उमेदवारी मिळवली गेली आहे. हे ऐकून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवरही आरोप केले गेले. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मंत्री अतुल सावे यांची भेट घेण्याचा आग्रह धरल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले, ज्यामुळे संताप उफाळून आला. उमेदवारांचा पारा चढला आणि त्यांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली, नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्षातील निष्ठावंतांना दुर्लक्षित केल्याबद्दल उमेदवारांनी त्रागा व्यक्त केला. पोलिसांना या संतप्त उमेदवारांना थोपवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्षातून निवडणूक लढवण्याची तयारी जाहीर केली आहे. तर एका महिला उमेदवाराने तर यापुढे भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याचा इरादा देखील जाहीर केला आहे.

यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक वॉर्डांमध्ये शिवसेना आणि इतर विरोधकांपेक्षा या बंडखोरांचा मोठा दबदबा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या बंडखोरांना शांत करून राजकीय संतुलन राखणे पक्षासमोर मोठे आव्हान बनले आहे.

हे देखील वाचा – Vanilla Sponge Cake : मऊपणा आणि गोडव्याचा संगम: व्हॅनिला स्पंज केकची खासियत; आता घरच्या घरी बनवा परफेक्ट व्हॅनिला स्पंज केक

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या