Bjp morcha– मविआ- मनसेच्या आज निघालेल्या सत्याच्या मोर्चाला (Bjp morcha)सत्ताधारी भाजपाने मूकमोर्चा काढून प्रत्युत्तर दिले. मात्र, या मूक मोर्चाच्या निमित्ताने भाजपा नेत्यांनी विरोधकांवर भरपूर तोंडसुख घेतले.
भाजपाचा हा मोर्चा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्यानासमोर एकाच जागेवर सुरू होऊन संपला. या मोर्चाला भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चित्रा वाघ आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. या मोर्चात सहभागी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या हातात, लोकसभा निवडणुकीची मतदारयादी बरोबर होती. मग विधानसभेवेळी तीच यादी चुकीची कशी? मतचोरी नाही तर मविआची मती चोरीला गेली आहे, असे लिहिलेले फलक होते. आंदोलकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून विरोध केला. मात्र, नंतर भाजपा नेत्यांनी विरोधकांवर टीका केली.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, मनसे आणि मविआकडून मुंबई पालिका निवडणुकीआधी फेक नरेटिव्ह निर्माण केले जात आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे नवे कथानक उभे करतात. त्यांच्यासोबत असलेली काही मंडळी आणि एनजीओ याचे प्रशिक्षण देतात. काँग्रेस नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने खोटे चित्र उभे करते. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही संविधानाबाबत असेच फेक नरेटिव्ह तयार केले होते. गरिबाला घर मिळाले पाहिजे, हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले. फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जात आहे. राज्यात विकास होत आहे. पण यावर कोणी काही बोलत नाही. यांच्या मोर्चाकडे डोळेझाक करा. यांच्याविरोधात आपण रान पेटवू या आणि यांचा डाव उधळून टाकू या.
——————————————————————————————————————————————————हे देखील वाचा –
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?









