Nashik Tapovan : कुंभमेळा 2027 करिता नाशिकच्या तपोवनात (Nashik Tapovan)साधुग्राम उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोडीवरून वाद सुरू आहे. मात्र जनतेचा आवाज न ऐकता आपलेच नियोजन पुढे सरकवत हैदराबाद येथून आणलेल्या रोपांचे वृक्षारोपण मंत्री गिरीष महाजन यांनी केले. त्यावेळी विरोध होऊ नये म्हणून आखाडा साधू व संतांच्या हस्ते मुद्दाम हा कार्यक्रम पार पाडला. शासनाने हरित नाशिकची घोषणा करून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज शहरातील मखमलाबाद परिसरात 15 हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी म्हटले की, नाशिककर वृक्षारोपण बास झाले असे म्हणेपर्यंत वृक्षारोपण करू. पण बदनामी करू नका, असे आवाहन केले. यावेळी पहिला टप्पा म्हणून 15 फूट उंचीची 600 रोपे लावण्यात आली. या कार्यक्रमाला काही आखाड्यांचे प्रमुख आणि त्र्यंबकेश्वर येथील साधुसंत विशेष उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, नाशिककरांच्या सहभागातून शहरात व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने 15 जानेवारीपर्यंत तपोवन वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे.कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आजपासून नाशिक शहरात वृक्षरोपणास सुरुवात झाली. त्याचबरोबर मोबाईल ॲपचे उद्घाटन झाले. या माध्यमातून झाडे कुठे लावणार ते समजणार आहे. यासाठी पालिका आयुक्त, अधिकारी शासन-प्रशासन काम करत आहे. तपोवन येथील 1700 झाडे काढणार असे सांगण्यात आले होते. पण तेवढी झाडे आम्ही काढणारच नव्हतो. 12 वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात साधू-महंतांसाठी जेवढ्या राहुट्या तपोवनात उभारल्या होत्या तेवढ्याच राहुट्या यावेळी तेथे उभारणार आहोत. त्यासाठी थोडी सुद्धा जास्तीची जागा घेणार नाही. तपोवन हे साधू संतांचे निवासस्थान आहे. तेवढी व्यवस्था आम्हाला करावी लागणार आहे. जी झाडे आम्ही काढणार आहोत त्याचे दुसरीकडे पुनर्रोपण करणार आहोत. गेल्या वेळी आम्ही हजार झाडे काढली होती. त्यापैकी 700 झाडे जगली आहेत. वृक्षप्रेमींनी विरोध केला, काही राजकीय संघटना कामाला लागल्या. त्यांनी माझे कुऱ्हाड, करवत घेऊन कार्टून बनवून प्रसिद्ध केले. ‘एक पेड मां के नाम’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. निसर्गप्रेमी पंतप्रधान आम्हाला वृक्षतोडीची परवानगी कशी देतील?
ते पुढे म्हणाले की, काही तरी गैरसमज झाले आहेत. कुंभमेळ्याची गरज काय ? साधूसंत गांजा प्यायला येतात अशी वादग्रस्त विधाने झाली. कुंभमेळा आमची अस्मिता आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची टिपण्णी करू नये. 15 हजार झाडांतील एकही झाड मरणार नाही. असे झाले तर त्यासाठी 400-500 जास्तीची झाडे आम्ही आणून ठेवू. आता 2 हजार झाडे पोहचली आहेत. एका ट्रकमध्ये 300 -400 झाडे बसतात. रोज 2-2 ट्रक पोहचतील. 15 हजार झाडे लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. 2 वर्षानंतर याठिकाणी दाट वनराई झालेली असेल. ही झाडे शासकीय तिजोरीच्या खर्चातून नाही तर सीएसआर फंडमधून आणली आहेत. तुम्हाला वचन देतो की, जोपर्यंत नाशिक शहरातील लोक बस म्हणत नाही तोपर्यंत झाडे लावणार आहे. पण तपोवनची जागा उद्योजकांच्या घशात घालायची असे आरोप आमच्यावर करू नका. तुमच्या अपेक्षेपेक्षा 10 पट झाडे आम्ही लावत आहोत. नाशिककरांचे समाधान झाल्यानंतरच आम्ही तपोवनातील झाडे काढणार आहोत. तुम्हाला प्रश्न असतील तर प्रशासनाला आणि शासनाला भेटा आणि माहिती घ्या. परंतु बदनामी करू नका.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
रात्रीच्या जेवणासाठी उच्च-प्रथिनेयुक्त हिवाळ्यातील सूप
धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; धुरंधरचा बॉक्स ऑफिसवर तुफान राडा..









