BMC Mayor Election BJP Vs Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या शतकोत्तर इतिहासात आज एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवत महापौर पदावर आपला झेंडा फडकावला आहे. भाजपच्या रितू तावडे यांची बुधवारी अधिकृतपणे मुंबईच्या महापौर पदी निवड झाली, तर शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी यांनी उपमहापौर पदाची धुरा सांभाळली. या निवडीसोबतच मुंबई महानगरपालिकेतील प्रदीर्घ काळ चाललेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून, शहराचा कारभार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवण्यात आला आहे.
हुतात्म्यांना अभिवादन आणि जल्लोषात आगमन-
सत्तारोहणाच्या या ऐतिहासिक क्षणापूर्वी महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सर्व नगरसेवक एका मिरवणुकीने महापालिका मुख्यालयात दाखल झाले. पालिका सभागृहात प्रवेश करताच महायुतीच्या नगरसेवकांनी शंखनाद करून संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
सभागृहात घोषणाबाजीचे युद्ध-
नव्या महापौरांच्या पदग्रहण समारंभाला सुरुवात होत असतानाच सभागृहात राजकीय संघर्षाची पहिली ठिणगी पडली. भाजपच्या नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देत सभागृह डोक्यावर घेतले. भाजपचा हा जयघोष सुरू असतानाच समोर असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी अनपेक्षितपणे ‘चोर है, चोर है’ अशा प्रतिघोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. शिवाय भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’चा नारा थांबवून ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ असा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा गजर सुरू केला.
नेत्यांची शांत उपस्थिती आणि भविष्यातील संघर्षाचे संकेत-
सभागृहात दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये सुरू असलेले हे घोषणाबाजीचे युद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम गॅलरीतून शांतपणे पाहत होते. भाजपच्या ‘देवाभाऊ’ आणि ठाकरे गटाच्या ‘ठाकरे-ठाकरे’ अशा घोषणांनी सभागृह बराच वेळ दणाणून गेले होते. महापालिकेच्या सत्तेच्या पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे दोन्ही पक्ष आमनेसामने आले, त्यावरून आगामी काळात मुंबईच्या नागरी प्रश्नांवरून भाजप आणि ठाकरे गटात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळणार, याचेच हे संकेत मानले जात आहेत.
Devendra Fadnavis: ‘अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा’; महापौर रितू तावडेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्तुतिसुमने
मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर आज महायुतीचे दोन प्रमुख शिलेदार महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी अधिकृतपणे विराजमान झाले. या पदारोहण सोहळ्याला उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींचे शासन पुन्हा प्रस्थापित झाल्याने प्रशासकीय कामांना आता नवी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
महापौर निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आम्ही मुंबईच्या जनतेकडे पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे वचन देऊन मते मागितली होती. मुंबईकरांनी आमच्या या भूमिकेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यालाच अनुसरून आज हे पदारोहण संपन्न होत आहे. रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईला एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व लाभले आहे.” मुंबईच्या विकासाचा जो रथ महायुती सरकारने ओढला आहे, तो आता पालिकेच्या माध्यमातून अधिक वेगाने पुढे जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
रितू तावडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “रितू तावडे या केवळ एक लोकप्रतिनिधी नसून त्या मुंबईच्या प्रश्नांची जाण असलेल्या अनुभवी नेत्या आहेत. एक अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी यापूर्वीही मुंबईकरांच्या ज्वलंत समस्यांसाठी सभागृहात आणि रस्त्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.” त्यांच्या अनुभवाचा फायदा मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितपणे होईल, अशी पावतीही त्यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेत आता खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य सुरू झाले आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकारने मुंबईसाठी आखलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि विकास कार्यक्रम आता पालिकेच्या यंत्रणेद्वारे तळागाळापर्यंत पोहोचवले जातील. रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या नेतृत्वाखालील ही नवीन टीम पारदर्शकतेचा नवा वस्तुपाठ घालून देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रितू तावडे यांच्या निवडीमुळे मुंबईच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा एक नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.










