Budget : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ‘अजितदादा अमर रहे’ च्या घोषणा आमदारांनी दिल्या. फडणवीस यांनी आजचा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित केला. ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प नसून विकसित महाराष्ट्राची वाटचाल आहे. 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा संकल्प आहे.शेतकर्यांना पूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला नाही. जूनपर्यंत पूर्ण कर्जमाफी जाहीर करू, असे सरकारने वारंवार सांगितले होते. मात्र आज केवळ दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली.
नाशिकच्या तपोवन भागात कुंभमेळ्यासाठी हजारो झाडे तोडण्यावरून सरकारवर टीका होत असताना त्यावर मलम लावण्यासाठी आज सरकारने 300 कोटी झाडे लावण्याची योजना जाहीर केली.लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,100 रुपये देण्याचे आश्वासन निवडणुकीवेळी देण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्पात त्या दृष्टीने कोणतीही तरतूद केलेली नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहील, इतकीच घोषणा आज करण्यात आली.
महान व्यक्तिमत्त्वांच्या – स्मृतीसाठी योजना
संत गाडगेबाबा तिर्थक्षेत्र विकसित केले जाईल. महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. डॉ. आंबेडकर यांच्या चवदार तळे शताब्दी निमित्त विकास आराखडा तयार केला जाईल, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, अजित पवारांच्या स्मृतीसाठी स्मारक उभारण्यात येईल.
कृषी योजना
शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जाईल, शेतीचे उत्पन्न खर्च कमी करणार, नैसर्गिक शेतीखाली अधिक शेतजमीन आणली जाईल, मत्स्य व्यवसायासाठी विशेष योजना राबवली जाईल, पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेत 27 लाखांपैकी 3 लाख घरे पूर्ण झाली आहेत, ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर केला आहे.
उद्योग योजना
महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल आहे. उद्योग वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेवाक्षेत्र आयुक्तालय स्थापन केले जाईल. स्टील हब म्हणून उदयास आलेल्या गडचिरोलीत मोठी गुंतवणूक करून रस्ते विकास मोहीम हाती घेतली जातील. त्यासाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येईल.
पर्यटन
वासोटा किल्ला (सातारा) येथे रोप-वे प्रकल्प होईल. रामटेक येथे तिसरी चित्रनगरी उभारण्यात येईल. पाच ज्योतिर्लिंगांचा विकास वेगाने करण्यासाठी ज्येष्ठ अधिकार्यांना जबाबदारी दिली आहे. तिसरी चित्रनगरी नागपूर जिल्ह्यात रामटेकमध्ये साकारली जाईल. मुंबई, दुबई, सिंगापूर येथे पर्यटन केंद्र सुरू केले जाईल.
दळणवळण योजना
विरार, ठाणे, बोईसर स्थानकाभोवतीचा विकास केला जाईल. 2030 पर्यंत एमएमआर परिसराची अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्यात येईल. एमएमआरमधील झोपड्यांना आळा घालण्याचे धोरण आणले जाईल. मुंबईत धारावी ते गेट वे दरम्यान दुसरा भुयारी मेट्रो मार्ग केला जाईल. ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग बांधला जाईल, छेडानगर ते आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग पूर्ण करून दक्षिण मुंबईला समृद्धी मार्गाला जोडला जाईल. पुण्याच्या मेट्रो-2 ला मान्यता देण्यात आली. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलमार्ग वाढविण्यात येतील. राज्यात एकूण 1,200 किलोमीटरचे मेट्रोमार्ग आणि 6,000 किमीच्या द्रूतगती मार्ग तयार केले जातील. मुंबई 490 किमीचे मेट्रो मार्ग होणार असून, त्यापैकी 176 किमीच्या मेट्रोचे काम सुरू आहे.
वाढवण बंदर महत्त्वाचे
एक हजारहून जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्याने जोडले जाईल. शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता दिली आहे. अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई तयार केली जाईल. तिची व्याप्ती रायगड जिल्ह्यातील पेणपर्यंत असेल. तर पालघर तालुक्यातील वाढवण येथे चौथी मुंबई तयार केली जाईल. या बंदराला समृध्दी महामार्गाला जोडले जाईल. वाढवण येथील मच्छिमारांसाठी सातपाटी येथे बंदर विकसित केले जाईल. वाढवण बंदराद्वारे 12 लाख रोजगार निर्मित होतील.
बुलेट ट्रेनच्या स्थानकांचे काम वर्षभरात
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील विरार, बोईसर व ठाणे या 3 स्थानकांचे काम फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल. मुंबईत 20 लाख झोपडपट्टी घरांच्या पुनर्विकासासाठी आणि 10 लाख परवडणारी घरे करण्यासाठी आराखडा करण्यात येणार आहे.
300 कोटी झाडे लावणार
महाराष्ट्रातील हरित पट्टा वाढविण्यासाठी 300 कोटी झाडे लावण्याची योजना हाती घेतली जाणार आहे. नदीजोड प्रकल्पांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
शेतकर्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी
30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकीत असलेल्या शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना सरकारने मंजूर केली आहे. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना 50 हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.
स्टार्टअपना प्रोत्साहन
मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सरकार 1 लाख 25 हजार उद्योजक घडवण्यासाठी स्टार्टअपना बळ देणार आहे. उद्योजकता केंद्र स्थापन करून यातील 50 सर्वोत्कृष्ट स्टार्टअपना निविदा न काढता सरकारतर्फे 25 लाखांपर्यंतची कामे दिली जातील.
एकनाथ शिंदे खूश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी निसर्गोपचार केंद्र उभारले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
नवे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना मोटार वाहन करात 30 टक्के सूट दिली आहे. तर इतर गाड्यांवरील पर्यावरण करात दुप्पट वाढ केली आहे. यातून 160 कोटी उत्पन्न मिळेल.
दुष्काळाचे संकट
2026 मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे हवामान तज्ज्ञांनी दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे लक्षात घेऊन पिण्याचे पाणी राखून ठेवणे, जलयुक्त शिवार व जलसंधारण योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प
निवडणुकीच्या वेळेला ज्या थापा मारल्या होत्या त्याच्या क्लिप अजूनही माझ्या फोनमध्ये आहे. आम्ही शेतकर्यांची कर्जमुक्ती 2 लाखांपर्यंत केली होती. एकूणच आजचा अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा कोरा नाही झाला. कर्ज काढून फटाके फोडल्यासारखे हा अर्थसंकल्प असल्याची टीका उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. ते पुढे म्हणाले की, साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांच्या सरकारने कालबद्ध पद्धतीने दोन लाख रुपयांपर्यंत शेतकर्यांची कर्जमुक्ती केली होती. त्यावेळी पात्र-अपात्र अशा अटींचे जंजाळ ठेवले नव्हते. शेतकर्याने दोन वेळा केंद्रावर जाऊन नोंदणी केल्यानंतर सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना आला. त्यामुळे नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याच दरम्यान आमचे सरकार पाडले गेले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याचाही कुठे उल्लेख दिसत नाही. मात्र कंत्राटदारांसाठी ठोस योजना आहेत. कोणत्या प्रकल्पासाठी किती निधी, किती मार्ग आणि किती कोटी खर्च होणार याचे तपशील दिले आहेत. शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी हा अर्थसंकल्प फसवा असून, विकासाचे मृगजळ दाखवणारा आहे.












