Mumbai Local Incident: मुंबई शहर हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी ओळखले जाते, मात्र मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये घडलेल्या एका संतापजनक प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका पुरुषाने चक्क बुरखा परिधान करून महिलांच्या राखीव डब्यात प्रवेश केला. इतकेच नाही तर बुरख्याच्या आड तो महिला प्रवाशांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला. बुरखा घातलेल्या एका व्यक्तीच्या हालचालींवर महिला प्रवाशांना संशय आला. त्याला जाब विचारला असता, तो पुरुष असल्याचे उघड झाले. महिलांनी त्याला पकडण्याचा आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकल घाटकोपर स्थानकात पोहोचताच या बुरखाधारी नराधमाने चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारली.
Shocking case on Mumbai local: Man in burqa disguise entered ladies compartment near Ghatkopar, allegedly tried molesting women. Alert passengers challenged him; he escaped by leaping to another train. FIR lodged at Ghatkopar PS; GRP & RPF investigating.
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 8, 2026
pic.twitter.com/GgqccoX11M
चकवा देऊन पसार
घाटकोपर स्थानकावर उडी मारल्यानंतर या आरोपीने समोरील प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या कर्जत जलद लोकलमध्ये प्रवेश केला आणि पळ काढला. पीडित महिलांनी तातडीने घाटकोपर येथील रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने मुलुंड स्थानकात कर्जत लोकलची तपासणी केली, परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. सध्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) याप्रकरणी भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. महिलांच्या डब्यात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. “अशा विकृत लोकांमुळे सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, आरोपीला कठोर शासन व्हावे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच वेळी डब्यातील सतर्क महिला प्रवाशांनी दाखवलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रेल्वे पोलिसांनी महिला प्रवाशांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.








