Maharashtra Highway Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग 160A या कॉरिडॉरच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. घोटी-त्र्यंबक (मोखाडा)-जव्हार-मनोर-पालघर या 154 किमी लांबीच्या टप्प्यासाठी एकूण 3,320.38 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि गरज
हा 154.635 किमी लांबीचा मार्ग ‘ईपीसी’ (EPC) मॉडेलवर विकसित केला जाणार आहे. यामध्ये काही भाग दोन पदरी तर काही भाग चार पदरी असेल. सध्या नाशिकच्या पश्चिमेकडील अंबड आणि सातपूर येथील औद्योगिक वसाहतींमधून होणारी अवजड वाहतूक नाशिक शहरातून जाते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होते. नवीन महामार्गामुळे ही वाहतूक शहराबाहेरून वळवणे शक्य होईल.
वाहतुकीचा ताण होणार कमी
- नाशिक शहराला वळसा: नवीन मार्ग त्र्यंबकमार्गे जात असल्याने नाशिक शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल.
- समृद्धी महामार्गाशी जोडणी: मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्रातून येणारी वाहतूक इगतपुरी इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गाद्वारे घोटी येथे या नवीन हायवेला जोडली जाईल.
- विस्तारीकरण: 2028 पर्यंत घोटी-त्र्यंबक दरम्यानची वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने हा टप्पा चार पदरी केला जाईल. तसेच मनोर-पालघर या शहरी भागातील रस्ताही चार पदरी करण्यात येईल.
आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती
हा प्रकल्प ‘पीएम गतिशक्ती’ योजनेअंतर्गत नियोजित असून, तो तारापूर आणि बोईसरमधील सेझ (SEZ), पालघर आणि मोखाडा येथील इंडस्ट्रियल पार्क आणि वाडा येथील औद्योगिक क्षेत्रांना जोडणार आहे. यामुळे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि जेएनपीटी (JNPT) पोर्टपर्यंतची मालवाहतूक अधिक सुलभ होईल.
पर्यटन आणि रोजगाराच्या संधी
या महामार्गामुळे त्र्यंबकेश्वर, जव्हार राजवाडा, वैतरणा नदी, केळवे बीच आणि अर्नाळा किल्ला यांसारख्या पर्यटन स्थळांना भेट देणे सोपे होईल. प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 20 लाख प्रत्यक्ष आणि 25 लाख अप्रत्यक्ष मनुष्यदिवस रोजगाराची निर्मिती होईल, असा अंदाज आहे. एकूण खर्चापैकी 2,594 कोटी रुपये प्रत्यक्ष बांधकामासाठी तर 725 कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च केले जाणार आहेत.










