Loco Running Staff protest : रेल्वे रनिंग स्टाफवरील वाढत्या कामाच्या ताणाविरोधात आणि सुरक्षिततेसंबंधीच्या मागण्यांसाठी मध्य रेल्वे मजदूर संघाच्या (Central Railway Workers Union) लोको रनिंग कर्मचाऱ्यांनी (Loco Running Staff protest) आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आंदोलन केले. रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वाजपेयी आणि सरचिटणीस अनिलकुमार दुबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी लोको रनिंग कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष विवेक सिसोदिया यांनी अनेक कर्मचारी कामाच्या ताणामुळे स्वेच्छानिवृत्तीची मागणी करत आहेत, पण तरीही जबरदस्तीने काम करवून घेतले जात असल्याचा आरोप केला.
विवेक सिसोदिया म्हणाले की, हे आंदोलन संपूर्ण मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून रनिंग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. रेल्वे प्रशासनाचे धोरण उदासीन आहे. आमच्या प्रशिक्षणाच्या वेळेवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत आणि आमच्याकडून पूर्ण सुरक्षिततेत काम करण्याची अपेक्षा केली जाते हे अन्य़ाय्य आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही झटत आहोत, पण आमची स्वतःची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. अनेक कर्मचारी कामाच्या ताणामुळे स्वेच्छानिवृत्तीची मागणी करत आहेत, पण तरीही जबरदस्तीने काम करवून घेतले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही आज हे आंदोलन केले. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे. जर प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये ब्रेक व्हॅनशिवाय गाड्या चालविणे बंद करणे, रेल्वे बोर्डाच्या ड्यूटी रूल्सचे काटेकोर पालन करणे, तसेच सर्व लॉबी, रेस्ट रूम आणि रनिंग रूम या रेल्वे बोर्डाच्या मानकानुसार सुविधा युक्त बनवणे आणि त्यांचे नियमित देखभाल करणे यांचा समावेश आहे. इगतपुरी, लोनावळा, पुणे, रोहा, मनमाड, शिर्डी, जळगाव आणि वसई रोड येथील रनिंग रूममधील स्वच्छता व भोजनाच्या गुणवत्तेत सुधारणा करावी. सर्व सायडिंग यार्डमध्ये पाथवे लाइटिंगची योग्य व्यवस्था करावी आणि मुंबई विभागातील सर्व रनिंग रूमचे नामनिर्दिष्ट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात यावे. याशिवाय उपनगरी रेल्वे व्यवस्थापकांसाठी परेल, ठाणे, दिवा जंक्शन, टिटवाळा, अंबरनाथ, बद्लापूर, वांगणी आणि कर्जत या स्थानकांवर बसण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था करावी, गुड्स ट्रेन मॅनेजर पदांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, तसेच महिला रेल्वे व्यवस्थापकांना रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार आवश्यक सुविधा पुरवाव्यात आदि मागण्यांचा समावेश आहे.