Central Railway Fine: मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी त्यांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. रेल्वेच्या तिकीट तपासनीस (TC) पथकाने गेल्या काही काळापासून राबवलेल्या धडक मोहिमेमुळे रेल्वेच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, मध्य रेल्वेतील २४ कर्मचाऱ्यांनी १ कोटी रुपयांच्या दंडाचा टप्पा ओलांडून ‘करोडपती टीसी’च्या यादीत स्थान मिळवले आहे.
महसुलात २३ टक्क्यांची मोठी वाढ
आर्थिक आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेने २०२४-२५ या वर्षात ३८.०५ लाख प्रवाशांकडून २०३.७० कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, २०२५-२६ या वर्षात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. या वर्षात ४१.८२ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून २५१.४२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या संख्येत ९.९४ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी दंडवसुलीतून मिळणाऱ्या महसुलात २३.४३ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे.
हे आहेत रेल्वेचे ‘सुपर २४’ कर्मचारी
या कामगिरीत २४ तिकीट तपासनीसांचे योगदान सर्वात महत्त्वाचे ठरले आहे. यामध्ये रेल्वे मुख्यालयातील १०, भुसावळ विभागातील १०, मुंबईतील ३ आणि पुणे विभागातील १ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
- निसार खान (भुसावळ): यांनी सर्वाधिक १ कोटी ४८ लाख २७ हजार ८७४ रुपयांची दंडवसुली केली आहे.
- एम. एम. शिंदे (मुख्यालय): मुख्य तिकीट निरीक्षक शिंदे यांनी सलग दोन वर्षे १ कोटींचा टप्पा पार केला आहे. यंदा त्यांनी १ कोटी ४६ लाख ३१ हजार २९० रुपये वसूल केले.
- संतोष कुमार गुप्ता (भुसावळ): १.१९ कोटी रुपयांच्या दंडवसुलीसह ते तिसऱ्या स्थानी आहेत.
- इतर कर्मचारी: सुभाष गलांडे (१.०९ कोटी), मोहम्मद शम्स (१.०६ कोटी), विनय ओझा (१.०६ कोटी), दीपक दहातोंडे (१.०६ कोटी), पी. बी. मेंथे (१.०४ कोटी), डी. एन. चौधरी (१.०४ कोटी) आणि एस. एम. धामणे (१.०२ कोटी) यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
विभागीय कामगिरीवर एक नजर
भुसावळ विभागाने तिकीट तपासणीत आपले वर्चस्व कायम ठेवले असून मुंबई आणि पुणे विभागातील कर्मचाऱ्यांनीही रेल्वेचा वाया जाणारा महसूल वाचवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. रेल्वे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले असून प्रवाशांना वैध तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.











