Chandrapur Deputy Mayor Election 2026 : चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षाचा आज अत्यंत नाट्यमय शेवट झाला. राजकीय गणिते आणि अनपेक्षित युतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे गटाच्या साथीने महापालिकेवर आपला भगवा फडकवला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी, तर ईश्वर चिठ्ठीच्या आधारे ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
महापौर निवडणूक: एका मताने फिरवले नशीब
महापौरपदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक मतदानाप्रसंगी अनुपस्थित राहिल्यामुळे बहुमताचा आकडा ६६ वरून ३३ वर आला होता. एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने निकालाची सूत्रे अधिकच गुंतागुंतीची झाली होती. अखेर भाजपच्या संगीता खांडेकर यांनी ३२ मते मिळवून निसटता विजय संपादन केला, तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका मताच्या फरकाने खांडेकर यांनी महापौरपद आपल्या नावे केले.
उपमहापौर निवडणूक: ईश्वर चिठ्ठीचा थरार
उपमहापौरपदाची निवडणूक तर त्याहूनही अधिक रोमांचक ठरली. काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप-ठाकरे गट युतीचे प्रशांत दानव यांच्यात थेट लढत झाली. अपेक्षेप्रमाणे, एमआयएमच्या नगरसेवकाने पप्पू देशमुख यांना पाठिंबा दिल्याने दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३२-३२ अशी समान मते पडली. सभागृहात समसमान मतांमुळे पेच निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकाऱ्यांनी नियमानुसार ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्याचा निर्णय घेतला. या चिठ्ठीत प्रशांत दानव यांचे नाव निघाल्याने नशिबाने त्यांना साथ दिली आणि त्यांची उपमहापौर म्हणून वर्णी लागली.
नव्या राजकीय समीकरणांचा उदय
या सत्तास्थापनेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची भूमिका निर्णायक ठरली. मूळतः भाजपकडे स्वतःचे २३ आणि शिंदे गटाचा १ असे २४ नगरसेवकांचे संख्याबळ होते. मात्र, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली सहा नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ ३२ पर्यंत पोहोचले. या अनपेक्षित युतीमुळे चंद्रपूरच्या राजकारणात एका नव्या समीकरणाचा जन्म झाला आहे.










