Chandrapur Election Results : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने अनेक ठिकाणी झेंडा फडकवला असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला असून 11 पैकी 8 जागांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
या दारुण पराभवानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली खदखद आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
विजय वडेट्टीवारांचा ‘टायगर’ पॅटर्न
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या या विजयाचे संपूर्ण श्रेय विजय वडेट्टीवार यांना दिले जात आहे. वडेट्टीवारांनी भाजपच्या 5 आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसचा विजय खेचून आणला. या विजयानंतर बोलताना त्यांनी, “राज्यात सत्तेचा वापर करून भाजपने विजय मिळवला असेल, पण चंद्रपुरात ‘टायगर अभी जिंदा है’ हे जनतेने दाखवून दिले आहे,” असा टोला लगावला.
जिल्ह्यातील बल्लारपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा यांसारख्या महत्त्वाच्या नगरपालिकांवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले असून, भाजपला केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मुनगंटीवारांचा स्वपक्षाला घरचा आहेर
चंद्रपुरातील पराभवाचा स्वीकार करताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना (वडेट्टीवार) ताकद दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली,” असे विधान करत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. पक्षात कुणालाही प्रवेश देताना जिल्हा नेतृत्वाला विचारले जात नाही आणि बाहेरच्या लोकांमुळे पक्षात गटबाजी वाढली असल्याची टीकाही त्यांनी केली.
“पक्षाचे दरवाजे शनिशिंगणापूरसारखे उघडे ठेवल्याने कुणीही येते आणि नवीन गट निर्माण करतो,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
फडणवीसांचे आश्वासन आणि मुनगंटीवारांचा टोला
चंद्रपूरच्या निकालावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांना पुन्हा ताकद देऊन महापालिका जिंकू, असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, “म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये मोठे अंतर आहे.”
मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना डावलल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी असून, त्याचाच परिणाम या निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुनगंटीवारांच्या या उघड नाराजीमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
हे देखील वाचा – घर बसल्या घ्या थिएटरचा आनंद! 55 इंचांचे प्रीमियम Smart TV आता बजेटमध्ये; पाहा Amazon वरील धमाकेदार डील









