वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण; आरोपपत्र सादर! ११ जणांची नावे

Charge sheet submitted in Vaishnavi Hagwane dowry case

पुणे– वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane case) हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचा पती, सासरे, सासू, दीर आणि नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात (Pune court) आरोपपत्र दाखल केले. या १६७० पानी दोषारोपपत्रात सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याची माहिती बावधन पोलीस (Bavdhan Police)ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली. या प्रकरणी प्रथमवर्ग न्या. अलिशा बागल यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

वैष्णवीला आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे, सुशील हगवणे, वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाइकांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी नीलेश चव्हाण आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र व सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम, मोहन,बंडू, अमोल व राहुल यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात हगवणे कुटुंबीयांसह एकूण सहा आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यापैकी लता, करिष्मा आणि नीलेश यांनी जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यापैकी नीलेशच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. तर लता व करिष्माच्या जामीन अर्जावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.