Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) आगामी राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षात कमालीचे नाराज असल्याची चर्चा असलेले ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली सूचक आणि अर्थपूर्ण वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी पक्षांतर्गत घडामोडींवर अत्यंत खोचक टिप्पणी केली. गेल्या २६ वर्षांतील राजकारणाचा दाखला देत ते म्हणाले की, “राजकारणात काहीजण अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करून पुढे आले आहेत. खरे तर सगळेच जण आपापल्या परीने कष्ट करत असतात; मात्र काही नशीबवान व्यक्ती अशाही असतात, ज्या कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता थेट पुढे जातात.

पक्षासाठी तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, हे स्पष्ट करताना त्यांनी, “जेव्हा आपापसात मतभेद किंवा मतभिन्नता होते, तेव्हा कोणी घर सोडून जात नाही, तर आपण आपली ठाम मते मांडत असतो,” असे सांगत आपली नाराजी उघड केली. भुजबळ यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

या अंतर्गत नाराजी नाट्यादरम्यान छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबद्दलही एक महत्त्वाचे विधान केले आहे. “अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुनेत्रा वहिनी पुढे आल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात मोठी प्रगती करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेकांना पक्षात राहून आपल्याला योग्य स्थान किंवा पदे मिळाली नाहीत असे वाटत असते, परंतु प्रत्येकाने निरंतर काम करत राहिले पाहिजे; पदे नेहमीच मर्यादित असतात, मात्र पक्ष सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करत असतो, त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *