Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या लेकीच्या प्रेमसंबंधांना विरोध करत, एका निर्दयी मातेने तिचा गळा आवळून खून केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. केवळ हत्या करून ही माता थांबली नाही, तर पुराव्याची विल्हेवाट लावण्यासाठी तिने मुलीचा मृतदेह एका गादीत गुंडाळून गावी नेण्याचा प्रयत्न केला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव कोल्हाटी येथील भारती उमेश साबळे (वय ३५) ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होती. तिची २० वर्षीय मुलगी, नंदिनी राजू धिवरे हिचे कन्नड येथील एका युवकाशी प्रेमसंबंध होते. नंदिनीला त्या तरुणाशी विवाह करायचा होता आणि ती त्यासाठी आपल्या आईकडे वारंवार आग्रह धरत होती. मात्र, भारतीचा या विवाहास ठाम विरोध होता. याच कारणावरून मायलेकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरात तीव्र वाद सुरू होते. १९ फेब्रुवारीच्या रात्री याच वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाले. संतापलेल्या आईने प्लास्टिकच्या पाइपच्या साहाय्याने नंदिनीचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा-
हत्येनंतर कायदेशीर कचाट्यातून वाचण्यासाठी आरोपी मातेने एक भयानक योजना आखली. तिने नंदिनीचा मृतदेह एका गादीमध्ये घट्ट गुंडाळला आणि दोरीने बांधून घेतला. ‘आम्हाला घरातील साहित्य घेऊन गावी जायचे आहे’ असे सांगून तिने वडगाव येथून तिसगाव चौफुलीपर्यंत एक रिक्षा भाड्याने केली. रिक्षामध्ये घरगुती सामान, प्लास्टिकचा ड्रम आणि ती संशयास्पद गादी भरत असताना रिक्षाचालकाला काहीतरी अस्वाभाविक असल्याचे जाणवले. त्याला त्या गादीमध्ये काहीतरी जड वस्तू किंवा संशयास्पद साहित्य असल्याची शंका आली.
त्या दांपत्याला तिसगाव चौफुली पुलाजवळ सोडल्यानंतर, सतर्क रिक्षाचालकाने तातडीने ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेची चौकशी सुरू केली.
पोलिसी तपासात सत्याचा उलगडा-
सुरुवातीला पोलिसांनी विचारपूस केली असता, भारती साबळेने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिची संशयास्पद वागणूक पाहून पोलिसांनी ती बांधलेली गादी उघडली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्या गादीत २० वर्षीय नंदिनीचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी पकडले गेल्याचे लक्षात येताच भारतीन बनाव रचला आणि ‘मुलीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असून आम्ही तिचा मृतदेह गावी घेऊन जात होतो’ असे सांगितले.
परंतु, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, वैद्यकीय अहवालात नंदिनीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या तांत्रिक पुराव्यासमोर भारतीचा बनाव टिकला नाही आणि तिने आपला गुन्हा कबूल केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी माता भारती उमेश साबळे हिच्याविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण वाळूज परिसरात खळबळ उडाली असून, सामाजिक स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.










