मुंबई- महायुती सरकारने राज्यात केवळ धान्यापासून मद्य (Alcohol)निर्मिती केली जाईल , अशा मद्याला महाराष्ट्र (Maharashtra) निर्मित मद्य असा परवाना दिला जाईल असे ठरवित त्यासाठीच्या अटी व शर्ती आज जाहीर केल्या. या प्रोत्साहनानंतर धान्यापासून होणाऱ्या मद्याची निर्मिती वाढेल. याचा थेट परिणाम गरिबांच्या ताटातील भाकरीवर होणार आहे. कारण मद्यासाठी आणखी धान्य (Grain) गेले तर आताच १०० ते १२० किलो असलेली ज्वारी , बाजरी आणखी महाग होईल.
राज्यात बनवल्या आणि विकल्या जाणाऱ्या या धान्यापासून बनविण्यात येणाऱ्या मद्याच्या निर्मिती प्रकल्पांसाठीच्या अटी व शर्तींचा तपशील सरकारने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, धान्य-आधारित मद्यनिर्मितीमुळे धान्याचे भाव वाढून सर्वसामान्यांच्या ताटातील भाकरी महागणार आहे.
महाराष्ट्र बनावटीची दारू केवळ धान्य आधारित असणार आहे. सध्या राज्यात धान्यापासून मद्य निर्मिती करणारे ४० प्रकल्प आहेत. त्यातील २७ प्रकल्प मंदीत सुरू आहेत. उर्वरित प्रकल्प बंद आहेत. या प्रकल्पांना नव्या धोरणामुळे उर्जितावस्था येणार आहे. नवीन प्रकल्पही सुरू होतील. या प्रकल्पांमध्ये राजकीय मंडळींची मोठी गुंतवणूक आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांतील नेते आहेत. एका नेत्याचा तांदळावर आधारित मद्य प्रकल्पालाही मान्यता मिळाली आहे. या राजकीय नेत्यांना या धोरणाचा मोठा लाभ मिळणार आहे.
देशी मद्याची १८० मिलीची बाटली साधारणपणे ८० रुपयांना मिळते, तर भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटलीची किंमत २२० रुपये आहे. या दोन्हीच्या किमतीत मोठा फरक असल्याने त्यातील मध्यममार्ग शोधून काढण्यासाठी सरकारने नवे धोरण आणले आहे. महाराष्ट्र मेड लिकर म्हणजेच एमएमएलची १८० मिलीची बाटली १५० ते १६० रुपयांना मिळेल, असा अंदाज आहे.
या प्रकल्पांमुळे धान्याच्या बाजारात तेजी येऊन शेतकऱ्यांना लाभ होईल असे म्हटले जात आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर धान्याचा वापर मद्यनिर्मितीसाठी होणार असल्याने धान्याची मागणी वाढून भाव वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे