BMC election 2025: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही अधिकृत घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेतील सर्व 227 जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असून, यामुळे मुंबईत आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसने का घेतला स्वबळाचा निर्णय?
मुंबई काँग्रेस संसदीय कार्य समितीची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्वबळाचा हा मोठा निर्णय घेण्यात आला. ठाकरे बंधूंची म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता होती.
विशेषतः मनसेच्या उत्तर भारतीय विरोधी भूमिकेमुळे काँग्रेसच्या व्होटबँकेवर परिणाम होण्याची भीती नेत्यांना वाटत होती. याशिवाय, मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि 950 हून अधिक इच्छुकांनी स्वतःचे बळ आजमावण्याची मागणी लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा पवित्रा घेतला आहे.
भाजप आणि ‘उबाठा’ शिवसेनेवर बोचरी टीका
पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला यांनी सत्ताधारी भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. गेल्या 4 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक रखडली असून, सरकार प्रशासनाच्या जोरावर महापालिका चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ही निवडणूक होत असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाचे आभार मानले.
“आम्ही ही निवडणूक केवळ भाजपविरोधातच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधातही लढत आहोत,” असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. मुंबईतील वाढते प्रदूषण, रुग्णालयांची दुरवस्था आणि प्रचंड भ्रष्टाचार या मुद्द्यांवर काँग्रेस लोकांसमोर जाणार आहे.
वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत
काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली असली तरी, ‘समान विचारसरणीच्या’ आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिलेले संकेत पाहता, वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची जवळीक वाढण्याची शक्यता आहे. वंचितचे प्रतिनिधी आम्हाला भेटत आहेत, असे सूचक विधान गायकवाड यांनी केले आहे.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आपला स्वतंत्र जाहीरनामा आणि गेल्या काही वर्षांतील भ्रष्टाचाराचे ‘आरोपपत्र’ लवकरच मुंबईकरांसमोर सादर करणार आहे.
आशिष शेलार आणि वर्षा गायकवाड यांच्यात ‘काव्ययुद्ध’
निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच नेत्यांमधील शाब्दिक युद्धही रंगात आले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी नुकतीच कवितेच्या माध्यमातून ठाकरे बंधू आणि काँग्रेसवर बोचरी टीका केली होती. शेलार यांच्या या कवितेला वर्षा गायकवाड यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
“स्वतः प्रत्यक्षात घेऊन फिरताहेत दोन कुबड्या, एक नाही धड, सांभाळताना झालेत जड,” अशा शब्दांत गायकवाड यांनी शेलार यांचा समाचार घेतला. या काव्ययुद्धामुळे मुंबईतील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून आगामी काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.









