मुंबई – राज्यातील बहुतांश भागांत सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (rainfall)नद्या, धरणे भरभरून वाहू लागली असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने (Meteorological Department)पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
नाशिकच्या (Nashik)गंगापूर धरणातून (Gangapur Dam)गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असून दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. गेल्या १७ दिवसांपासून गोदावरी नदी (Godavari river) सातत्याने वाहत असून रामकुंड परिसर पाण्याखाली गेला आहे. सध्या ४,६५६ क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्याने पाणीपातळीत आणखी वाढ होत आहे. रात्री पुराच्या पाण्यात तरुण अडकला होता. तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंटच्या खांबाचा आधार घेतला. स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने त्याला बाहेर काढले.
नालासोपारा, वसई आणि विरारमध्ये (virar) काल रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली.वसई विरार मध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसात होत्या. त्यामुळे शहरातील सखल रस्ते जलमय झाले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नालासोपारा पूर्वेकडील राजमाता नगर, गालानगर ,संकेश्वर नगर, आचोळे रोड, या परिसरात जलभराव झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गेले काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीत लावली दमदार हजेरी लावली.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून धामणी व कवडास धरणातून सूर्या नदीत तब्बल ४०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे.पिंपरी-चिंचवडच्या पवना धरणात ७२ टक्के पाणी साठा झाला असून पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेक्सने सुरू करण्यात आला आहे. भंडारदरा परिसरातही प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात रात्रीच्या संततधार पावसामुळे मातीचे घर कोसळले. छत अंगावर पडल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (red alert)जारी करण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सातारा व कोकणातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.