Home / महाराष्ट्र / Election : एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी ! पालिका निवडणूक निकाल लांबणार?

Election : एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी ! पालिका निवडणूक निकाल लांबणार?

Election- एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार असल्याने यावेळी महापालिका निवडणुकीचे (Election) निकाल रखडण्याची शक्यता आहे. वॉर्डनिहाय मतमोजणी होणार असल्यामुळे...

By: Team Navakal
maharashtra election commissioner
Social + WhatsApp CTA

Election- एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार असल्याने यावेळी महापालिका निवडणुकीचे (Election) निकाल रखडण्याची शक्यता आहे. वॉर्डनिहाय मतमोजणी होणार असल्यामुळे साधारणपणे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होईल की नाही याची शाश्वती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. याविषयी व्यवस्थापन मात्र अजून संभ्रमातच आहे. नेमकी मतमोजणी कोणत्या पद्धतीने करायची याच्या मार्गदर्शक सूचना तातडीने जारी कराव्यात, यासाठी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.


16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, जर एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्यात आली तर या संपूर्ण मतमोजणीसाठी भरपूर वेळ लागेल. एका प्रभागाच्या मतमोजणीसाठी साधारणत: एक ते दीड तासांचा कालावधी गृहीत धरला तर ज्या शहरात अधिक प्रभाग आहेत तिथले निकाल मध्यरात्रीपर्यंत तरी लागतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या महापालिकांचे कमी प्रभाग आहेत, तिथले चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण राज्यातील मोठ्या महापालिकांचे निकाल हाती येण्यास उशीर लागू शकतो. ही प्रक्रिया लांबल्यास पालिका व पोलीस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. मतमोजणीवरील आक्षेप आणि वाद पाहता ही प्रक्रिया आणखी वेळखाऊ ठरणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.


मुंबईत 227 प्रभाग असून त्यासाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये आहेत. प्रत्येक निवडणूक कार्यालयांतर्गत 8-10 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया होईल. ईव्हीएमच्या मतमोजणीपूर्वी सुमारे टपाल मतांची मोजणी करणे आवश्यक असल्यामुळे त्यासाठी अर्धा ते एक तास लागेल, तर एका प्रभागातील सुमारे सात हजार मतांची मोजणी पूर्ण करण्यासाठी किमान दीड ते दोन तासांचा कालावधी आवश्यक आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून याबाबत आक्षेप नोंदवला आहे. या पद्धतीमुळे एका निर्णय अधिकार्‍याच्या कार्यक्षेत्रात 8 प्रभाग असतील, तर प्रत्येक प्रभागासाठी सरासरी तीन तास धरले तरी आठव्या प्रभागाचा निकाल येण्यासाठी 24 तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. परिणामी, संपूर्ण मुंबईचे निकाल जाहीर होण्यासाठी दुसरा दिवस उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उमेदवार आणि मतदारांना ताटकळत ठेवावे लागेल, जे लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य नाही, असे या पत्रात म्हटले आहे. मुंबई पालिकेने मात्र एकावेळी एका प्रभागाची मतमोजणी केल्याने निकालास विलंब होण्याच्या शक्यतेचा इन्कार केला आहे.

निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये सुमारे 28 टेबल लावण्यात येणार आहेत. एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर होणार असल्याने अर्ध्या ते एका तासात निकाल लागेल. शिवसेना उमेदवार सचिन पडवळ याबाबत म्हणाले की, एका वेळी केवळ एका प्रभागाची मतमोजणी केल्यामुळे निवडणुकीचे निकाल रखडणार आहेत. त्यामुळे पालिकेने यासाठी योग्य मार्ग शोधावा. निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सर्व प्रभागांमध्ये एकाच वेळी मतमोजणी सुरू करणे अधिक परिणामकारक ठरेल.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

अवघ्या ८ तासांच्या लेकीने पित्याचे घेतले अखेरचे दर्शन; जवान प्रमोद जाधवांच्या अंत्यदर्शनाने आसमंत पिळवटला

महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा सुरक्षिततेसाठी नवा मार्ग; सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या