Criminal Candidates in Pune Election : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सुशिक्षित आणि निष्कलंक उमेदवारांना प्राधान्य देण्याऐवजी, गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
शहर गुन्हेगारी मुक्त करण्याचे आश्वासन देणारे पक्षच आता आरोपींच्या हातात सत्तेच्या चाव्या सोपवण्यास तयार झाल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे.
तुरुंगातून निवडणूक रिंगणात: आंदेकर कुटुंब चर्चेत
पुण्यातील सर्वात जुनी आणि कुख्यात समजल्या जाणाऱ्या आंदेकर टोळीतील सदस्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
- सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर: प्रभाग 23 मधून या दोघी निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, आयुष्य कोमकर हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली या दोघी सध्या येरवडा कारागृहात आहेत.
- बंडू आंदेकर: टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर हा देखील याच प्रकरणात अटकेत आहे. तो पोलिसांच्या कड्या पहऱ्यात आणि हातात बेड्या असलेल्या स्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला होता. संपूर्ण आंदेकर कुटुंबावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
बापू नायर यांची राजकीय एन्ट्री
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग 39 मधून बापू नायरला उमेदवारी दिली आहे. बापू नायरवर हत्या, अपहरण आणि खंडणी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- दीपक मारटकर हत्या प्रकरण: 2020 मधील दीपक मारटकर यांच्या हत्येचा कट तुरुंगात बसून रचल्याचा आरोप नायरवर आहे.
- दहशत: कात्रज, धनकवडी आणि परिसरात नायरची मोठी दहशत राहिली असून 2024 मध्येच तो जामिनावर बाहेर आला आहे.
भाजपकडूनही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नातेवाईकांना संधी
गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकारणात आणण्यात भारतीय जनता पक्षही मागे राहिलेला नाही. अनेक गंभीर गुन्ह्यांत अडकलेल्या आरोपींच्या पत्नींना भाजपने उमेदवारी दिली आहे.
जयश्री मारणे: कुख्यात गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांनीही यापूर्वी निवडणूक लढवली असून, त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी विश्वाचा राजकारणात हस्तक्षेप वाढल्याचा आरोप होत आहे.
प्रतिभा चोरघे (प्रभाग 38): रोहिदास चोरघे यांची पत्नी प्रतिभा चोरघे यांना भाजपने संधी दिली आहे. रोहिदास चोरघेवर हत्या, अपहरण, पोलिसांवर हल्ला आणि गोळीबाराचे अनेक गुन्हे नोंद आहेत. संदीप बांदल हत्या प्रकरणातही त्याचे नाव होते. फरारी असतानाही त्याने अनेक ठिकाणी गोळीबार करून दहशत निर्माण केली होती.









