CSMT Madgaon Summer Special Train Cancelled : कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांच्या २० फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले होते. उन्हाळी सुट्ट्या आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांचा काळ विचारात घेऊन ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत या साप्ताहिक विशेष गाड्या धावणार होत्या. मात्र, या गाड्यांची घोषणा केल्यानंतर अवघ्या २४ तासांत रेल्वे प्रशासनाने ५ एप्रिल रोजीच्या नियोजित दोन फेऱ्या रद्द केल्या आहेत. प्रशासनाच्या या धरसोड वृत्तीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांच्या नियोजनावर फिरले पाणी-
रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ एप्रिलपासून या विशेष गाड्यांच्या सेवा सुरू होणार होत्या. सलग सुट्ट्यांचा काळ असल्याने प्रवाशांनी मोठ्या उत्साहात या गाड्यांचे आरक्षण केले होते किंवा प्रवासाचे बेत आखले होते. ऐन प्रवासाच्या आदल्या दिवशी किंवा घोषणा होताच फेऱ्या रद्द झाल्याचे समजल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेषतः कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी या गाड्या अत्यंत महत्त्वाचा आधार होत्या, परंतु प्रशासनाच्या या निर्णयाने त्यांच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४६ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली खरी, मात्र अंमलबजावणीच्या पहिल्याच टप्प्यात रेल्वे प्रशासनाचा मोठा गोंधळ समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यानच्या २० फेऱ्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते संतरागाछी दरम्यानच्या २६ फेऱ्या अशा एकूण ४६ सेवांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या घोषणांचा आनंद फार काळ टिकला नाही; कारण ५ एप्रिल रोजी धावणाऱ्या पहिल्याच दोन महत्त्वपूर्ण फेऱ्या रेल्वेने तडकाफडकी रद्द केल्या आहेत.
आरक्षणासाठी प्रवाशांची धडपड आणि निराशा-
कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांचे तिकीट आरक्षण १ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. त्यानुसार, अनेक प्रवाशांनी पहाटेपासूनच संगणकावर किंवा आरक्षण खिडक्यांवर गर्दी केली होती. ५ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्रमांक ०१०१९ (CSMT – मडगाव) आणि परतीच्या प्रवासासाठीची गाडी क्रमांक ०१०२० (मडगाव – CSMT) या साप्ताहिक विशेष गाड्या चाकरमान्यांसाठी अत्यंत सोयीच्या होत्या. मात्र, १ एप्रिलला आरक्षण सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांना दुसऱ्याच दिवशी या फेऱ्या रद्द झाल्याचा धक्कादायक निरोप मिळाला.
मध्य रेल्वेच्या धरसोड वृत्तीमुळे चाकरमान्यांचा प्रवास खडतर; सलग सुट्ट्यांच्या काळात विशेष गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष-
आगामी शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’ निमित्त असलेली सार्वजनिक सुट्टी आणि त्यानंतर लागून आलेली शनिवार-रविवारची साप्ताहिक सुट्टी, असा सलग तीन दिवसांचा काळ साधून मुंबईकरांनी मोठ्या संख्येने कोकण आणि गोवा पर्यटनाचे नियोजन केले होते. मात्र, मध्य रेल्वेने ऐनवेळी घोषित केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे. प्रशासनाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आता प्रवाशांना नियमित गाड्यांमधील तुडुंब गर्दीतून प्रवास करावा लागणार असून, अनेकांना आपला प्रवासच रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.
कोकण रेल्वेच्या मर्यादित फेऱ्या आणि वाढता मनस्ताप-
मुंबईतून राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या सातत्याने कमी होत असल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात धावणाऱ्या गाड्यांची संख्या अत्यंत मर्यादित असून त्या बोटावर मोजण्याइतपतच आहेत. नियमित गाड्यांची प्रतीक्षा यादी (Waiting List) आधीच शेकडोच्या घरात असल्याने विशेष गाड्या हाच प्रवाशांसाठी मुख्य आधार होता. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या विशेष सेवाच रद्द झाल्याने राज्यातील प्रवाशांच्या हक्काच्या प्रवासावर गदा आली आहे.
परराज्यातील गाड्यांवर अवलंबून राहण्याची वेळ-
महाराष्ट्रातील प्रवाशांना आपल्याच राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वारंवार परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. या गाड्यांमध्ये आधीच इतर राज्यांतील प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना हक्काची जागा मिळणे कठीण होते.
सलग सुट्ट्यांच्या काळात कोकणवासीयांचे हाल; मुंबई-सावंतवाडी आणि मुंबई-रत्नागिरी विशेष गाड्या सोडण्याची ‘कोकण विकास समिती’ची आग्रही मागणी-
आगामी शुक्रवार ते रविवार या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी अपेक्षित आहे. मात्र, मध्य रेल्वेने ५ एप्रिल रोजीची नियोजित विशेष फेरी ऐनवेळी रद्द केल्याने प्रवाशांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुंबई ते सावंतवाडी आणि मुंबई ते रत्नागिरी या मार्गांवर अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी आग्रही मागणी ‘कोकण विकास समिती’ने केली आहे.
प्रतीक्षा यादीचा डोंगर आणि प्रवाशांची हतबलता-
सध्याच्या घडीला कोकणाकडे जाणाऱ्या सर्वच नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी (Waiting List) शेकडोच्या घरात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ५ एप्रिलची विशेष गाडी अत्यंत उपयुक्त ठरली असती. मात्र, रेल्वेने नेमकी हीच फेरी रद्द केल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “प्रवाशांची वाढती संख्या पाहता अतिरिक्त गाड्यांची नितांत गरज आहे, तरीही नियोजित गाड्या रद्द करणे हे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,” असे मत आता व्यक्त केले जात आहे.











