Ajit Pawar Death : नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर सभा घेत दिवस-रात्र भ्रमण करीत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांचे आज अत्यंत धक्कादायकरित्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. दादांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून शारदा प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता बारामतीत विद्या प्रतिष्ठान येेथे दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विशेष उपस्थित राहणार आहेत.
आज सकाळीच अजित पवार यांचे विमान बारामतीत उतरत असतानाच अपघातग्रस्त झाले आणि विमानातील सर्व प्रवाशांचे निधन झाले. विमानाचा स्फोट झाल्याने विमानाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले होते. अजित पवार यांचे पार्थिव त्यांचा नेहमीचा गॉगल आणि हातातील घड्याळ यावरून ओळखण्यात आले. या दुर्दैवी अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या अपघातात अजित पवार यांचे खासगी सुरक्षा रक्षक विदिप जाधव, वैमानिक सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि परिचारिका पिंकी माळी यांचेही दु:खद निधन झाले.
या अपघाताची माहिती कळल्यावर महाराष्ट्र सुन्न झाला. अजित पवार गेले यावर कुणाचाच विश्वास बसेना. जेव्हा ही दुर्दैवी बातमी खरी असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांचे सर्व समर्थकच नव्हे तर त्यांचे कट्टर विरोधकही शोकाकूल झाले. अजित पवार यांच्यावर सातत्याने आरोप करणारे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही अश्रू अनावर झाले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांवर कडाडून टीका करणारे महेश लांडगे यांनाही रडू कोसळले. ज्या बारामतीपासून अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्याच बारामतीत जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या तीन सभा घेण्यासाठी ते विशेष विमानाने येत असताना अपघात झाला आणि बारामतीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बारामतीतून काका-पुतण्याला हद्दपार करा अशी भीमगर्जना करणारे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे उद्या याच बारामतीत येऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांच्यापासून त्यांच्या बारामतीतील व महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना रडू कोसळले. त्यांचे पार्थिव बारामतीतील आहिल्याबाई होळकर रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाबाहेर शोकाकूल कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. योगेंद्र पवार, रोहित पवार तातडीने रुग्णालयात पोहोचले. जय पवार आपल्या पत्नीसह आले. संसद अधिवेशनासाठी दिल्लीत गेलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे तातडीने दिल्लीहून रवाना झाले आणि दुपारपर्यंत बारामतीत पोहोचले. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी विशेष विमानाने बारामतीत दाखल झाले. दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आचार्य देवव्रत हेही अंत्यदर्शनासाठी आले. दादांच्या आठवणी व्याकूळ झालेले अनेक नेते बारामती गाठत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्याबद्दल अत्यंत भावनिक अशी पोस्ट केली आणि तेही बारामतीकडे रवाना झाले.

अजित पवारांचा अपघातापूर्वी
राणाजगजीतसिंह पाटलांना फोन
अजित पवारांचे अपघातापूर्वी शेवटचे बोलणे भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी झाले. विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी राणाजगजीतसिंह पाटील यांना फोन केला होता. विमान बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणे होणार होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या आहेत.

अजित पवारांच्या निधनाने नुकसान
केंद्रीय गृहमंत्री शहांचे वक्तव्य
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवार यांचे आज एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी अजित पवार यांनी केलेले समर्पण शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे.
दादांची सासरवाडी तेर गाव
बंद! कार्यकर्त्यांचा आक्रोश
अजित पवार यांची सासरवाडी असलेले धाराशिवचे तेर गाव संपूर्ण बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा पाळला गेला. अजित पवारांच्या जाण्याने आमचे गाव पोरके झाले, अशा भावना गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. शाळांना सुट्टी देण्यात आली. व्यापारी वर्गाने दुकाने बंद करत श्रद्धांजली वाहिली.
पालकमंत्र्यांच्या निधनामुळे बीडमध्येही बाजारपेठा बंद ठेवत दुखवटा पाळला. अजित पवारांची आठवण सांगताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. मागील वर्षभरापासून अजित पवार बीडचे पालकमंत्री होते. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळली होती. बीडकरांनी अजित पवारांच्या शब्दाला मान देऊन नगरपालिका त्यांच्या हाती सोपवली. महाराष्ट्राच्या राजकारणाला शाप आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे आणि आता अजित पवारांसारखा राजकीय पालक आम्हाला मिळणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची दुर्दशा ही भरून निघणार नाही, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अर्थसंकल्प विक्रम करणार होते
अजित पवार यंदाच्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार होते. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची 13 वी संधी होती. 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या नावे आहे. अजित पवार यांनी यावेळी या विक्रमाची बरोबरी केली असती. वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक 11 वेळा जयंत पाटील आणि सुशिलकुमार शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. आता यावेळी अर्थमंत्री कोण होणार आणि अर्थसंकल्प कोण सादर करणार याची चर्चा सुरू झाली आहे.

सहकार क्षेत्रातील योगदान सदैव
स्मरणात! राष्ट्रपतींकडून शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांचे अकाली निधन ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.
राजकारण बेचव झाले
संजय राऊत यांची श्रद्धांजली
ऐन उमेदीत अजित पवार यांचे जाणे मनाला चटका लावणारे आणि खूप धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण अळणी, बेचव झाले. ज्या बारामतीशी त्यांचे अतूट नाते होते तिथेच त्यांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत व्हावा हा विचित्र योगायोग आहे. एक दिलखुलास व्यक्ती, रोखठोक माणूस आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला नेता, अशी अजितदादांची प्रतिमा महाराष्ट्राच्या मनातून कधीही पुसली जाणार नाही. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस आहे, अशा शब्दांत उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अत्यंत वेदनादायक
राहुल गांधींची प्रतिक्रिया
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांचे आज झालेल्या विमान अपघातातील निधन ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. या दुःखद क्षणी मी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे. पवार कुटुंबियांना तसेच त्यांच्या सर्व आप्तस्वकीयांना या दुःखाच्या काळात माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
सहकार क्षेत्रातील योगदान सदैव
स्मरणात! राष्ट्रपतींकडून शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांचे अकाली निधन ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.
कर्तबगार नेतृत्व गमावले
राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला आणि अत्यंत वेदना झाल्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तबगार नेतृत्व गमावले आहे. अजित पवार यांनी स्वत:ला महाराष्ट्राच्या विकास आणि समृद्धीसाठी
स्वतःला वाहून घेतले होते. जनसामान्यांबद्दलची त्यांची तळमळ आणि सेवेप्रती असलेली त्यांची अतूट निष्ठा सर्वांनीच पाहिली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, हितचिंतकांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्या प्रति माझ्या संवेदना मनापासून व्यक्त करतो.

राजकीय आरोप करणारे
महेश लांडगेही हळहळले
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्यावर राजकीय आरोप करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. लांडगे यांनी एक्स पोस्ट करत म्हटले की, अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. अजितदादांसारखा धडाडीचा, निर्णयक्षम आणि प्रचंड कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहा वाजल्यापासून तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल.
धक्कादायक बातमी! शब्दच नाहीत
आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट
अजितदादांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. शब्दच नाहीत अशी भावना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.आदित्य ठाकरे म्हणाले की, दादांसोबत गेली पाच ते सहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा सरकारमध्ये आणि नंतर काही काळ विरोधी पक्षात. विधिमंडळाच्या कामकाजावर त्यांची असलेली रुबाबदार पकड आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना कायम भावायचा. मी विरोधी पक्षात असतानाही हे अनेकदा जाहीरपणे म्हटले होते. आजची बातमी खरेच मोठा धक्का देणारी आहे.
एका प्रभावी पर्वाचा अंत
पृथ्वीराज चव्हाणांची श्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संवेदना व्यक्त करताना म्हटले की, अजित पवार यांच्या जाण्याने कर्तृत्ववान, संघर्षशील आणि दांडगा प्रशासकीय अनुभव असलेला नेता आपण गमावला आहे. अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात. अशा स्पष्टवक्त्या नेत्याच्या निधनाने महाराष्ट्रातील एका प्रभावी पर्वाचा अंत झाला आहे.
पवारांचा आधारस्तंभ कोसळला
जितेंद्र आव्हाडांचे भावनिक उद्गार
राजकारणाच्या चौकटीबाहेरचा नेता हरपला. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशा भावूक शब्दांत शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एका शब्दात अजित पवारांचे वर्णन करायचे झाले, तर ते निडर होते. परिणामाची चिंता न करता निर्णय घेणे हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे चालणे-बोलणे राजकारणातले असूनही राजकारणाच्या चौकटीबाहेरचे होते. मी 1990 पासून अजित पवारांसोबत काम करत आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सक्षम आणि खंबीर नेता गमावला आहे. मात्र, सर्वात मोठी हानी पवार कुटुंबाची झाली आहे. पवार कुटुंबियांचा राजकीय वारसा आणि खरी ताकद पुढे नेण्याची क्षमता अजित पवारांकडे होती. आणि आज तेच आपल्यातून निघून गेले. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
मुंबई पालिका कार्यालय बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे मुंबई महापालिकेने शहरातील सर्व पालिका कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय दुपारनंतर जाहीर केला. मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळून इतर कार्यालये बंद ठेवण्यात आली होती.
अजित पवारांचे जाणे
धक्कादायक – प्रकाश आंबेडकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाती निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शोक व्यक्त केला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा बळी गेला आहे. त्याची अत्यंत योग्य आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आपल्या ट्विटर संदेशात आंबेडकर म्हणाले की, अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने मला खूप धक्का बसला आहे. अजित पवारांची काम करण्याची एक स्वतःची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती, हे नाकारता येणार नाही. त्यांच्या पत्नी, कुटुंब, मित्र आणि पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लिअरजेट-45 जीवघेणे ठरले
विमानाचे दोन वर्षांत दोन अपघात
उपमुख्यमंत्री अजित पवार आज व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ज्या लिअरजेट-45 विमानातून प्रवास करत होते, त्याच कंपनीचे विमान यापूर्वीही मुंबईत अपघातग्रस्त झाले होते. एकाच कंपनीच्या एकाच प्रकारच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात आता गंभीरचर्चेचा विषय ठरत आहेत. याबाबत आज उद्योगपती आणि मार्केटिंग तज्ज्ञ सुहेल सेठ यांनी व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या तांत्रिक तपासणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुहेल सेठ यांनी एक्स पोस्ट करत म्हणाले की, आज सकाळी अपघात झालेले विमान व्हीएसआर एव्हिएशन या कंपनीच्या मालकीचे आहे. हे अपघातग्रस्त झालेले या कंपनीचे दुसरे विमान आहे. ही कंपनी पिता-पुत्र चालवत असून, ते नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर आमचा प्रभाव असल्याचे ते सांगत फिरतात. जणू काही नियम आणि तपासणी त्यांच्या खिशात आहेत. ही चार्टर कंपनी तातडीने बंद केली पाहिजे.
व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय कुमार सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, विमान उतरवण्याचा निर्णय पूर्णतः वैमानिकाचा होता. सुरुवातीला वैमानिकांनी रनवे क्रमांक 29 वर लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र काही अडचणी निर्माण झाल्याने त्यानंतर रनवे क्रमांक 11 वर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला. विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. वैमानिक आणि सहवैमानिक यांना प्रदीर्घ अनुभव होता. आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक किंवा यांत्रिक बिघाड नव्हता. 2023 मधील मुंबई विमानतळावरील अपघात हा मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे झाला. लँडिंगनंतर विमान रनवेवरून घसरले होते आणि ती घटना सध्याच्या अपघातापेक्षा
वेगळी होती.
व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही खासगी जेट आणि चार्टर्ड विमानसेवा पुरवणारी दिल्लीतील कंपनी आहे. दिल्लीतील महिपालपूर येथे तिचे कार्यालय आहे. ही कंपनी गेल्या सुमारे 15 वर्षांपासून हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. लिअरजेट-45 विमानाची प्रवासी क्षमता नऊ प्रवाशांपर्यंत असते. हे विमान प्रामुख्याने विशेष दौरे आणि तातडीच्या प्रवासासाठी वापरले जाते. ही कंपनी खासगी जेट भाड्याने देणे, वैद्यकीय सेवांसाठी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासह सल्लागार सेवाही पुरवते. दिल्ली, मुंबई, भोपाळ, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांदरम्यान या कंपनीद्वारे नियमित चार्टर उड्डाणे केली जात होती. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे सुमारे 60 वैमानिक आहेत .
यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.32 वाजताच्या सुमारास व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे व्हीटी – डीबीएल हे लिअरजेट-45 हे विमान विशाखापट्टणमहून मुंबईकडे येत असताना मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर घसरले होते. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि अपघातग्रस्त झाले. विमानाचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर विमानाला आग लागली होती. या विमानात पायलट, सह-पायलट आणि सहा प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र सर्व प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले होते.
दोन वर्षांत एकाच कंपनीच्या दोन विमानांचे अपघात होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. 2023 च्या अपघातानंतर या विमानांची देखभाल, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा मानकांबाबत आवश्यक ती पावले उचलली गेली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही कंपनी जुनी, रद्दी अवस्थेतील विमानं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सेवेसाठी वापरत आली आहे, असाही आता आरोप केला जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
या लिअरजेट-45 विमानांची कामगिरी जागतिक पातळीवरही फारशी चांगली नाही. मेक्सिकोमध्ये 2021 साली मेक्सिकन हवाई दलाचे लिअरजेट 45 विमान उड्डाणानंतर लगेच कोसळले. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. मेक्सिको सिटीमध्ये 2008 रोजी मेक्सिकोच्या गृहमंत्र्यांचे लिअरजेट 45 विमान अपघातग्रस्त झाले. विमानातील सर्व प्रवासी आणि जमिनीवरील सात जणांचा मृत्यू झाला होता. इटलीत 2003 मध्ये मिलान विमानतळावर पक्ष्यांच्या धडकेमुळे या विमानाचा अपघात झाला होता.
अजित पवार यांची मुंबई पालिकेला अविस्मरणीय भेट
मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू अनेकांना भुरळ घालत असते. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी पालिका मुख्यालयात भेट दिली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना बरोबर पाच वर्षांपूर्वी 28 जानेवारी 2021 रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भेट दिली होती. पालिकेची वास्तू त्यांच्या मनाला खूपच स्पर्शून गेली होती. आपल्या भाषणात या वास्तूचे आणि मराठी माणसाच्या कर्तृत्वाचे गोड कौतुक आणि खंतही त्यांनी व्यक्त केली होती. बोलके डोळे, गोड हसू आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या अजित पवार यांची भेट अनेकांसाठी अविस्मरणीय ठरली. ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचा शुभारंभानिमित्त अजित पवार महापालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. या औपचारिक कार्यक्रमात अजित पवार यांनी भाषण केले होते. ते म्हणाले, या महापालिकेच्या इमारतीची संकल्पना ब्रिटिश वास्तुतज्ज्ञाची असली तरी, पण या इमारतीचे निवासी अभियंता आणि बांधकाम ठेकेदार दोघेही मराठी होते. म्हणजे या इमारतीच्या उभारणीत मुख्य योगदान मराठी माणसाचे आहे. मी गेली 30,35 वर्षे लोकप्रतिनिधी आहे. मुंबईत येतो, राज्य शासनात काम करतो. पण इतकी वर्षे कधीही मला महापालिका मुख्यालयात बोलावले गेले नाही. आज पहिल्यांदाच आत येण्याची
संधी मिळाली.
नेत्यांना अश्रू अनावर झाले
प्रतिक्रिया देणेही कठीण
पुणे – अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. काही नेत्यांना भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच सापडत नव्हते. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना फोनवरून नातेवाईकांना निधनाची बातमी देताना अश्रू अनावर झाले. नांदेडचे अजित पवार गटाचे एकमेव आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे धाय मोकलून रडताना दिसले. आठवणींनी व्याकूळ झालेल्या सरोज आहिरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांची लहानगी नात आयेझा मुश्रीफ, याशिवाय आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, आमदार धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके, अनिल देशमुख यांच्यासह पवार कुटुंबातील अन्य सदस्य व नातेवाईकांनाही रडू आवरले नाही.
आज पुन्हा पोरका झालो
धनंजय मुंडे ढसाढसा रडले
आज पुन्हा पोरका झालो. माझ्या सारख्याला वडील नाहीत याची कधी जाणीव नाही होऊ दिली, अशा भावना अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवल्या. ते गाडीत बसून कॉलवर बोलताना त्यांना शब्द फुटत नव्हते. त्यांना अक्षरशः रडू आले.
धनंजय मुंडे म्हणाले की, आज पुन्हा पोरका झालो. माझे दादा मला पोरका करून गेले.माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझे आणि दादांचे नाते शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता होता. आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले अजूनही असे वाटते की आता दादांचा फोन येईल आणि म्हणतील धनंजय वेळेवर ये बरका. त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाही.
हे देखील वाचा –









